उरणमध्ये ६१ विद्यार्थी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:44 AM2018-08-24T00:44:12+5:302018-08-24T00:44:42+5:30
शहरातील भागूबाई चांगू ठाकूर इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस रस्त्याच्या कडेला कलंडली.
उरण : शहरातील भागूबाई चांगू ठाकूर इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस रस्त्याच्या कडेला कलंडली. सुदैवाने सर्वच विद्यार्थी थोडक्यात बचावले. उरण पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे.
उरण येथील द्रोणागिरी नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. उरण परिसरातील शहरी आणि ग्रामीण भागातील पहिली ते दहावीचे शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता शाळा सुटल्यानंतर एमएच-४६/०२५० क्रमांकाची बस ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र, फुंडे शाळेजवळ उरण-पनवेल रस्त्यावरून जाताना बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. प्रसंगावधान राखून वाहनचालकाने ६१ मुलांना बाहेर काढले. पलटी झाली नसल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप आलेत. अखेर विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसने शाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अपघातामुळे भेदरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आले.
स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे वाहनचालकाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या अपघाताबाबत चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल, असे उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि. निवृत्ती कोल्हटकर यांनी सांगितले.