जिल्ह्यातील ६२९ इमारती धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:24 AM2019-07-17T00:24:50+5:302019-07-17T00:25:40+5:30
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच रायगड जिल्हा प्रशासनाने ११ नगरपालिका क्षेत्रातील ३९८ आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २३१ अशा एकूण ६२९ इमारती या धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे.
अलिबाग : धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच रायगड जिल्हा प्रशासनाने ११ नगरपालिका क्षेत्रातील ३९८ आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २३१ अशा एकूण ६२९ इमारती या धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना नोटिसाही बजावलेल्या आहेत. असे असताना देखील या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक बिनधास्त राहात आहेत. प्रशासनाने त्यांना नोटीस बजावून आपले दगडाखाली अडकलेले हात बाहेर काढले आहेत, मात्र अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी पुनर्विकासाचे प्रकल्प राबवले आहेत का याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कानावर हात ठेवल्याचे दिसून येते.
धोकादायक इमारतींबाबत रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागितला होता. त्यानुसार ११ नगरपालिका क्षेत्रातील ३९८ इमारती या धोकादायक आढळल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्जत नगरपालिका क्षेत्रातील २२६ इमारतींचा समावेश आहे. उरणमधील ७४ पैकी ६६ इमारती या खाजगी आहेत, तर सहा इमारती सरकारी मालकीच्या आहेत. माथेरान नगरपालिकेच्या हद्दीत चार खासगी आणि दोन सरकारी इमारतींचा समावेश आहे.
पनवेल महानगरपालिका २३१, अलिबाग १२, मुरुड ४, पेण ९, खोपोली ३, रोेहा १०, महाड ४३, श्रीवर्धन ११ इमारती या धोकादायक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ३९८ इमारतींची यादी प्रशासनाने जाहीर केली असली तरी, त्यातील काही इमारती या दुरुस्त करता येण्यासारख्या आहेत. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करावा यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केला नाही अथवा मागणी आली नाही, असे रायगडच्या निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले. नव्याने सरकारी इमारती बांधणीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे असेही नमूद केले. धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचा वापर करणे, पुलावरून पाणी जात असल्यास दिवसा-रात्री वाहतूक बंद करावी, पुलाच्या दोन्ही बाजूने पक्के बॅरीकेटिंग करावे, पूल ओलांडण्यास मज्जाव करावा, पोलीस बंदोबस्त ठेवावा अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
>रायगड जिल्ह्यातील धोकादायक पूल
सार्वजनिक बांधकाम महाड विभागाच्या अखत्यारीत २६ मोठे पूल आहेत. आंबेत म्हाप्रळ रस्त्यावरील आंबेत पूल, महाड करंजाडी मार्गावरील दादली पूल, वीर टोळ आंबेत रस्त्यावरील टोळ पूल हे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे या पुलावरुन २० मेट्रिक टनापेक्षा अधिक वजनाच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. दुरुस्तीची कामे मंजूर असतानाही कार्यादेश प्राप्त न झाल्याने काम रखडले आहे.
पनवेल विभागाकडील राज्यमार्गावरील ७९ पूल आहेत. जिल्हा मार्गावरील ४४ पूल आहेत. सर्व पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. कर्जत तालुक्यातील दहिवली पूल हा बुडीत पूल आहे.अलिबाग विभागाकडील राज्य मार्गावरील १३९ पूल आहेत, तर जिल्हा मार्गावरील ७६ पूल आहेत. सरकारच्या निर्देशानुसार पुलांची संबंधित यंत्रणेकडून पावसाळ््यापूर्वी त्याचप्रमाणे नियमित पाहणी केली जाते. सहान पाल्हे पूल आणि रेवदंडा पुलावरुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली आहे.महाराष्ट्र रस्ते वाहतूक मंडळाच्या अखत्यारीतील अंबा नदीवरील पाली पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. खोपोली-पेण या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ६० मीटर पेक्षा जास्त लांबीच्या १४ पुलांचे तांत्रिक परीक्षण करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याबाबतचा अहवाल कोकण भवन येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाकडे आहे.