पेणमध्ये ६.५० लाखांच्या वर रोपांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:15 AM2019-06-07T00:15:43+5:302019-06-07T00:15:49+5:30

लगबग सुरू : रामवाडी येथील रोपवाटिकेमध्ये अडीच लाख रोपांची निर्मिती

Up to 6.50 lakh seedlings will be planted in pen | पेणमध्ये ६.५० लाखांच्या वर रोपांची होणार लागवड

पेणमध्ये ६.५० लाखांच्या वर रोपांची होणार लागवड

googlenewsNext

दत्ता म्हात्रे

पेण : जागतिक पातळीवर तापमानवाढीमुळे होणाऱ्या बदलाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. एकीकडे डोक्यावरील ऊन प्रचंड तापत आहे, तर दुसरीकडे वृक्षांअभावी सावली शोधायला जायचे कुठे? हा प्रश्न सतावत आहे. दररोज वाढत्या प्रदूषणामुळे श्वास गुदमरू लागलेला असून त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हरवलेली हिरवळ उजाड माळरानावर पुन्हा नव्याने निर्माण करू, या संकल्पनेतून विविध शासकीय कार्यालयामार्फत तब्बल ६.५० लाखांच्या वर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्या अनुषंगाने सामाजिक वनिकरण विभागाच्या रामवाडी येथील रोपवाटिकेमध्ये अडीच लाख रोपांची निर्मिती करण्यात आली असल्याचे रोपवाटिकामधील अधिकारीवर्गाने सांगितले.

पेणमध्ये यावर्षी सुमारे पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प महाराष्टÑ राजवटीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने नजरेसमोर विविध शासकीय कार्यालयाने ठेवलेला आहे. यानुसार पेण वनक्षेत्र विभागाने दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प पेण वनक्षेत्रातील मोकळ्या जागांवर केलेला आहे. त्याची पूर्वतयारी सध्या जोरदार सुरू असल्याचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी सांगितले. दुसरीकडे पेणच्या सामाजिक वनिकरण विभाग दोन लाख २० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, या विभागाची अडीच लाख विविध प्रकारची रोपे त्यांच्या रोपवाटिकांमध्ये लागवडीसाठी सज्ज झाली असल्याचे वनअधिकारी म्हात्रे यांनी सांगितले. पेण पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ६२ ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन हजार २५० या प्रमाणे एकूण दोन लाख ११ हजार २५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, असे गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी कृषी विभागामार्फत माहिती घेऊन सांगितले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व विविध सामाजिक संस्था तसेच निमशासकीय कार्यालय हेसुद्धा वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार आहेत.

झाडांची संख्या कमी झाल्याने प्रदूषणात वाढ
महाराष्ट्र राज्यात २०१० मध्ये सात लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर वृक्ष आच्छादन होते. हे राज्याच्या एकूण भूभागाच्या २.३ टक्के इतके होते. २०१७ मध्ये यामधील ८०४ हेक्टर क्षेत्रावरील वृक्ष आच्छादन नष्ट झाले. परिणामस्वरूप ७०.८ किलो टन कार्बन डायआॅक्साइडच्या उत्सर्जनास चालना मिळाली.

यामुळे प्रदूषणात वाढ होऊन प्रदूषणाचा निर्देशांक वाढला. सन २००१ ते २०१७ या कालावधीत १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील वृक्ष आच्छादनाची हिरवळ नष्ट पावली आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या ताज्या अहवालात देशासहित राज्यातील हरवलेल्या हिरवळीचा उल्लेख करून त्यावर अहवालात नेमके बोट ठेवण्यात आलेले आहे.

दरवर्षी साजरा होणारा जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने हिरवळ पुन्हा नव्याने निर्माण करणे मानवाच्या संस्कृतीच्या हिताचे आहेच. सजीव सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे संरक्षण ही संकल्पना सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे.

Web Title: Up to 6.50 lakh seedlings will be planted in pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.