अलिबाग : सहावा आंतराराष्ट्रीय योग दिन आज, रविवारी २१ जून रोजी साजरा होत आहे. त्यामुळे यंदाचा योग दिवस आपापल्या घरातच योगाची प्रात्यक्षिके करून साजरा करण्याचे निर्देश आयुष मंत्रालयाने दिले आहेत. दरवर्षी योग दिवस कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण सध्या देशात कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव असल्याने, लोकांनी जास्त संख्येने एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने योग प्रात्यक्षिक आसने घरांमध्येच करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ६व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना ‘घर घर में योग परिवार के साथ योग’ ही ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे घरात कुटुंबासोबत राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून योगाभ्यास करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.घरात राहून योगाभ्यास केल्याने संसर्गजन्य कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो, तसेच योगासने केल्यामुळे आपणास कोरोनाच्या सदृश्य परिस्थितीमध्ये व श्वसन संस्था रोगप्रतिकारक शक्ती व मानसिकदृष्ट्या सबळ राहण्यासाठी मदत होऊ शकते. त्याप्रमाणे योग करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा आयुष अधिकारी डॉ. हेमा भोपाळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन घरातच होणार साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:19 AM