जिल्ह्यात ७ हजार ३०९ दहीहंड्या ; डीजेवरील निर्बंधामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक वाद्यांना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:29 AM2018-09-03T03:29:59+5:302018-09-03T03:30:10+5:30
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्त सर्वत्र दहीकाला उत्सव सोमवारी उत्साहात साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये २ हजार १५० सार्वजनिक, तर ५ हजार १५९ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे.
अलिबाग : श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्त सर्वत्र दहीकाला उत्सव सोमवारी उत्साहात साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये २ हजार १५० सार्वजनिक, तर ५ हजार १५९ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात १६० मिरवणुकाही निघणार आहेत. यंदा उत्सवाच्या कालावधीत डीजेवर निर्बंध असल्याने पारंपरिक वाद्यांवरच समाधान मानावे लागणार आहे.
अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, निजामपूर यासह अन्य शहरांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांच्या भरघोस बक्षिसांची लयलूट होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने १६२ ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
दहीहंडीचा उत्सव साजरा होत असताना जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा दक्ष झाली आहे. त्यासाठी शीघ्र कृती दलाची कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे. कोकणामध्ये दहीहंडी उत्सवामध्ये सोंग काढण्याची परंपरा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. अलिबाग कोळीवाडा परिसरातून आजही पौराणिक, ऐतिहासिक तसेच सद्यस्थितीवर भाष्य करणारी सोंगे काढली जातात. त्यामध्ये यंत्रावरील चलचित्राचा वापर न करता प्रत्यक्षामध्ये कलाकार सहभाग घेऊन देखावा उभा करतात. शहरातील विविध भागातून त्यांची मिरवणूक काढली जाते. आजही हे पाहण्यासाठी नागरिक प्रचंड गर्दी करतात.
गोपाळकालानिमित्त बाजारपेठाही चांगल्याच फुलल्या आहेत. दहीहंडीसाठी लागणारी विविध रंगबेरंगी मडकी बाजारात विक्रीसाठी आली आहेत. ५० रु पयांपासून ते ३०० रु पयांपर्यंत त्यांची किंमत आहे. अशा कलरफुल मडक्यांना मागणी जास्त असल्याने याचे मार्केटही तेजीत आहे.
उत्सवाच्या कालावधीत डीजेवर निर्बंध असल्याने गोविंदांमध्ये निरु त्साह असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता पारंपरिक वाद्यांच्या तालावर गोविंदांना ठेका धरावा लागणार आहे.
गोपाळकालानिमित्त रायगड जिल्ह्यात मंगळवारी एकूण ७ हजार ३०९ ठिकाणी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक १४, खासगी ९०, नेरळ- सार्वजनिक ६८, खासगी १५८, माथेरान-सार्वजनिक ७, खालापूर- सार्वजनिक ११, खासगी १९०, खोपोली- सार्वजनिक ६०,खासगी ५५, रसायनी- सार्वजनिक १०५, खासगी १४०, पेण- सार्वजनिक १११, खासगी २७०, दादर सागरी- सार्वजनिक ४५,खासगी १०५, पोयनाड सार्वजनिक ९७,खासगी ४६, वडखळ- सार्वजनिक ११५,खासगी १५०, अलिबाग- सार्वजनिक १0५, खासगी ३६0, रेवदंडा- सार्वजनिक १३०, खासगी २५६, मुरु ड- सार्वजनिक १४६, खासगी १९७, मांडवा सागरी- सार्वजनिक ७५, खासगी १७०, रोहा- सार्वजनिक १८९, खासगी ७६, कोलाड- सार्वजनिक ६९,खासगी ५८, नागोठणे- सार्वजनिक ५२,खासगी २३५, पाली - सार्वजनिक ११९,खासगी ४८, माणगाव- सार्वजनिक १७,खासगी ३१२, गोरेगाव-सार्वजनिक २४, खासगी ९२, तळा- सार्वजनिक ६८, खासगी २६०, श्रीवर्धन-सार्वजनिक ६८,खासगी १२५, म्हसळा- सार्वजनिक ८९, खासगी ५३५, दिघी- सार्वजनिक ३५, खासगी ९००, महाड शहर- सार्वजनिक ६५,खासगी ७९, महाड तालुका- सार्वजनिक १०५, खासगी ११३, महाड एमआयडीसी- सार्वजनिक ८६, खासगी ७०, पोलादपूर- सार्वजनिक ७५, खासगी ८७ अशा एकूण सार्वजनिक २ हजार १५० तर खासगी ५ हजार १५९ दहीहंड्या फुटणार आहेत.
बालगोपाळांचा गोपाळकाला
खोपोली : गोपाळकाला आबालवृद्धांचा सण मानला जात असला तरी बच्चेकंपनीचा उत्साह मात्र काही औरच असतो. शहरातील नर्सरी शाळांमध्ये विविध ठिकाणी गोपाळकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
छोटे विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचा गणवेश परिधान करून तर विद्यार्थिनी गोपिका झाल्या होत्या. नटून-थटून आलेल्या गोपिका व त्यांच्यात श्रीकृष्णाचा गणवेश केलेले बालगोपाळांमुळे शाळांना गोकुळाचे स्वरूप आले होते.
श्रीरामनगर येथील फेरी लँड या नर्सरी शाळेत गोपाळकाला रंगला. छोट्यांबरोबर शिक्षिकांचाही उत्साह ओसंडून वाहत होता.