जलयुक्त शिवारसाठी ७० कोटींचा निधी , रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये होणार कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:26 AM2017-12-15T02:26:24+5:302017-12-15T02:26:31+5:30
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. यासाठी जिल्ह्याला ७० कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आराखड्यात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे बोलले जाते.
अलिबाग : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. यासाठी जिल्ह्याला ७० कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आराखड्यात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे बोलले जाते.
जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या प्राथमिक आराखड्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. त्यामध्ये लोकसहभागातून कर्जत तालुक्यातील सात गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील नऊ गावे व तालुकास्तरीय समितीने निवडलेली ४१ तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ५६ अशा एकूण ११३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या ११३ गावांमध्ये तब्बल दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. कृषी विभाग ३६ कोटी ७८ लाख, लघुसिंचन विभाग सहा कोटी ३० लाख, ग्रामीण पुरवठा विभाग १२ कोटी ९३ लाख, आणि वन विभागाकडील पाच कोटी २२ लाख रु पयांची कामे केली जाणार आहेत.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये ३८ गावे निवडण्यात आली आहेत. या गावात विविध विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांपैकी शिल्लक कामे पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना सर्व विभागांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या. यावेळी २०१७-१८साठी निवडलेल्या गावांबाबतही आढावा घेण्यात आला. या गावांमध्ये लोकसहभागातील कर्जत तालुक्यातील ७ गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील ९ गावे व तालुकास्तरीय समितीने निवडलेली ४१ तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ५६ अशी एकूण ११३ गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये विविध यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या मृद व जल संधारणाच्या कामांच्या आराखड्यांना या सभेमध्ये तत्वत: मान्यता देण्यात आली. २०१७-१८ मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रे डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करून जानेवारी २०१८ मध्ये कामे सुरू करण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.
जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ए.एस.शेळके, उपवनसंरक्षक मनीषकुमार, उपजिल्हाधिकारी रोहयो ए.ए.जैतू तसेच कृषी विभाग, वन विभाग, लघुसिंचन (जलसंधारण) विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग या विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन आराखडा तयार
नव्याने आराखडा तयार केलेल्या ११३ गावातील दोन हजार ७०९ कामांचे व्यवस्थित नियोजन होण्यासाठी एका गावामध्ये फक्त ७० लाख रु पयेच खर्च करण्यावर भर देण्यात आला आहे.
त्यापेक्षा अधिकची रक्कम लागणार असेल तर संबंधित समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तीन लाख रुपयांपासून ४५ लाख रुपयांपर्यंतची कामे जलयुक्त शिवार योजनेत करता येणार आहेत.
२०१६-१७ या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा हा ३५ कोटी रु पयांचा होता.
या वर्षी त्यामध्ये तब्बल दुप्पट वाढ करून ७० कोटी रु पयांवर नेला आहे.
२०१६-१७ या कालावधीत ३८ गावांतील विविध कामांसाठी २६ कोटी रु पये प्राप्त होऊन नऊ कोटी बाकी होते.
त्याही कामांना आता गती देऊन ती पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.