केएमसीला संशोधनासाठी ७० लाख
By admin | Published: December 8, 2015 12:55 AM2015-12-08T00:55:01+5:302015-12-08T00:55:01+5:30
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित केएमसी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेस भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फेसंशोधनासाठी विशेष
खोपोली : खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित केएमसी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेस भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फेसंशोधनासाठी विशेष अनुदान मंजूर झाले आहे. विभागाच्या फंड्स फॉर इम्प्रुव्हमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (फिस्ट) या योजनेअंतर्गत शैक्षणिक विकास व संशोधनासाठी महाविद्यालयास ७० लाख रु पये एवढे अनुदान मंजूर झाले आहे.
विज्ञान शाखेचा शैक्षणिक विकास, संशोधन, उपकरणे, प्रयोगशाळेचे संगणकीकरण, पुस्तके, मासिके, प्रयोगशाळा नूतनीकरण या बाबींसाठी या योजनेचे अनुदान वापरता येईल. विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन संशोधनास गती मिळावी व त्यातून चांगले संशोधक तयार व्हावेत, समाज व राष्ट्राच्या विकासास त्यामुळे मदत व्हावी, ही भूमिका या योजनेमागे आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महेश खानविलकर व डॉ. शरद पंचगल्ले यांनी परिपूर्ण असा प्रस्ताव शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केला होता. महाविद्यालयाच्या या प्रस्तावाचे कलिंगा विद्यापीठ, भुवनेश्वर (ओरिसा) येथे सादरीकरण केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्याचे विभागाकडून नुकतेच कळविण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या विकासासाठी या योजनेचा उपयोग होऊन संस्था व महाविद्यालयाच्या नावलौकिकात यामुळे मोलाची भर पडली आहे. त्यामुळे पालक, नागरिक व विद्यार्थी- विद्यार्थिनींनीही आनंद व्यक्त केला आहे. महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही योजना पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. शैक्षणिक व उत्तम संशोधनासाठी या योजनेचा परिपूर्ण उपयोग करून घेऊन महाविद्यालयास प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. नरेंद्र पवार यांनी दिली. (वार्ताहर)