वैभव गायकरपनवेल : वारंवार सूचना देऊनही प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालवणे, कागदपत्र सोबत न बाळगणे, तीनपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे आदी प्रकारात दोषी आढळलेल्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून आरटीओने सुरू केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक रिक्षाचालक दोषी आढळले आहेत. ही संख्या जवळपास ७0 इतकी आहे. दोषी आढळलेल्या या रिक्षांचे परमिट तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. पनवेल, खांदा वसाहत, खारघर, कामोठे, कळंबोली, रोडपाली आदी ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्वसाधारण प्रवासी बनून आरटीओ अधिकारी रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अद्याप ८0 रिक्षाचालकांवर विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत सुमारे सव्वा लाखाचा दंड देखील गोळा झालेला आहे. प्रवाशांच्या रिक्षाचालकांविरोधात वाढत्या तक्र ारी लक्षात घेता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ९00४६७0१४६ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेलमधील ७0 रिक्षांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:30 AM