पोलादपूर : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे पाणीटंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या या दुहेरी संकटाचा सामना सध्या ठिकठिकाणी करावा लागत आहे. पोलादपूर तालुक्यातील २३ गावे, ४७ वाड्यांसाठी तालुक्यातील सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश टंचाई निवारण आराखड्यात करण्यात आला होता. यापैकी सद्य:स्थितीत २३ गावे, ४७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्त ७० गाव, वाड्यांमध्ये केवनाळे, चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, दाभिल, सडेकोंड , सडे, बोरघर, वाकण, नानेघोळ या गावांसह केवनाळे आंबेमाची, बोरघर बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, वडघर - दिवाळवाडी, सनसपेढा, पवारवाडी, उलालवाडी, सणसवाडी, फौजदारवाडी तर कामथे येथील जांभडी, फौजदारवाडी, शेंबिवाडी, आदिवासीवाडी, मोरसाडे गावातील वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.टंचाईग्रस्त गावांना सुरळीत पाणीपुरवठा२३ गावे, ४७ वाड्या अशा एकूण ७० गाव, वाड्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून चार टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, तालुका प्रशासनाने पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन दोन टँकर वाढवले आहेत. टंचाईग्रस्त कोणतेही गाव, वाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी तालुका प्रशासनाने सर्व उपाययोजना केली असून पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागातील जी. ई .कांबळे यांनी सांगितले.
पोलादपूर तालुक्यातील ७० गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाई, सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 1:04 AM