७० टक्के युवक पब्जीच्या आहारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:38 AM2020-08-17T01:38:02+5:302020-08-17T06:51:37+5:30
लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.
निखिल म्हात्रे
अलिबाग : सध्या पब्जी या खेळाने यंगीस्थानात रान माजविलेले आहे. त्यामुळे पब्जी या खेळाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत प्रयत्न सुरू असताना, या खेळाच्या आॅनलाइन स्पर्धांना उधाण आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.
सध्याच्या युवावर्गाचा आवडता गेम म्हणजे प्लेयर्स अननोन बॅटलग्राउंड अर्थात पब्जी हा आॅनलाइन खेळ, पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे. रोज रात्री १० ते २ या वेळेत अनेक यूट्युब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत पब्जीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज साधारण ४० ते ५० हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत. त्यांना संकेतस्थळांच्या माध्यमातून २० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम टीप देतात.
पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी सांगितले. अभ्यास आणि सर्व दैनंदिन कामे संपवून नंतरच पब्जी गेम खेळावा. मैदानी खेळ हे मोबाइल खेळांपेक्षा महत्त्वाचे आहेत. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो, तसेच पब्जीबाबतही होते, असे मी सातत्याने माझ्या फेसबुक पेजवर सांगत असतो. मात्र, ते आपण कितपत मनावर घ्यायचे, हे स्वत: ठरविले पाहिजे.
>वेळीच मुलांना बाहेर काढणे गरजेचे - मानसोपचार तज्ज्ञ
स्पर्धेसाठी आॅनलाइन वॉररूम तयार करण्यात येते. स्पर्धा तीन ते चार तास चालते. शेवटी आॅनलाइन जिवंत राहणाऱ्या स्पर्धकाला पाच हजारांपासून ते एक कोटी रु पयांपर्यंत बक्षीस मिळते, असे सोशल मीडियावर सांगण्यात येते. तर मोठ्या पब्जी स्पर्धा जागतिक पातळीवर खेळल्या जातात. सर्वाधिक गुण मिळविणाºयाला थेट पब्जी फोरमतर्फे जागतिक पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. समूहानेही सहभाग घेता येतो. त्यामुळे आॅनलाइन साखळीत आताची मुले अडकून पडली आहेत. त्यांना योग्य वेळीच यातून बाहेर काढणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ अमोल भुसारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.