चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:23 AM2018-06-13T04:23:49+5:302018-06-13T04:23:49+5:30

अलिबाग तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आहे.

 700 acres of agriculture hazard in four villages | चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात

चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात

Next

- जयंत धुळप
अलिबाग - तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. गेल्या २५ वर्षांत याबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने ७०० एकर भातशेती व चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार या चार गावांतील मानवी वस्तीला धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे. याबाबत लेखी निवेदन चरी गावातील शेतकरी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार गावांतील २४ बाधित शेतकऱ्यांनी अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांना सोमवारी दिले.
सरकारने या गंभीर समस्येबाबत सत्वर उपाययोजना करावी, या अपेक्षेने याच निवेदनाच्या प्रती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनावणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनाही देण्यात आल्याचे चरी गावातील शेतकरी रवींद्र पाटील यांनी सांगितले.
चरी खारभूमी योजनेत ७०० एकर भातशेती आहे, त्यावरच शेतकºयांची उपजीविका चालते. याच भातशेतीला लागून चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार ही गावे व त्यांची शेती आहे. या गावांचे व भातशेतीतील पावसाचे पडणारे पाणी नैसर्गिकरीत्या निचरा होण्याचा मार्ग म्हणजे ‘टाशी’(नाला) आहे. गावकरी दरवर्षी सामूहिक श्रमदान करून त्यातील साचलेला गाळ काढायचे. परिणामी, पावसाळ््यात पाण्याचा निचरा सुयोग्य प्रकारे होऊन भातशेती आणि गावांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होत नसे, असा पूर्वइतिहास या निवेदनात लक्षात आणून देण्यात आला आहे.
१९८०च्या सुमारास आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता महसुली गाव चरीमधील सलग क्षेत्राचे संपादन करताना नेमके पाणी जाण्याच्या नाल्यावर मातीचा भराव केला गेला. त्यानंतर या रेल्वेलाइनच्या दोन्ही बाजूस पाणी जाण्याकरिता पर्यायी नाला आरसीएफने खणून दिला. मात्र, त्या नाल्यातील गाळ दरवर्षी काढला जात नसल्याने ७०० एकर भातशेतीचे पाणी नैसर्गिकरीत्या निचरा होऊन वाहून जात नसल्याने भातपीक व भाजीपाला कुजतो आणि शेतकºयांची लागवड व त्यावर वर्षभर केलेली मशागत फुकट जाऊन, शेतकºयांच्या हातात काही उत्पन्न येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रेल्वेलाइनलगतच्या नालेसफाईची मागणी
स्थानिक पातळीवर अनेकदा ही बाब लक्षात आणून देऊनही गेल्या २५ वर्षांत या समस्येकडे कृषी खाते वा खारभूमी विकास खाते यांनी लक्ष घातले नसल्याने समस्या गंभीर झाली आहे. नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जाण्याच्या पर्यायी नाल्यातील गाळ काढण्याची जबाबदारी आरसीएफ थळची असून, पावसाळ््यापूर्वी लक्ष घालून रेल्वेलाइनलगतच्या नाल्यातील गाळ उपसण्याची कार्यवाही त्यांच्याकडून करून घेऊन शेती पिकासहित वाचवावी, अशी विनंती या निवेदनात अखेरीस करण्यात आली आहे.

Web Title:  700 acres of agriculture hazard in four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.