CoronaVirus News: रायगड जिल्ह्यातील ७०० दहीहंड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:45 AM2020-08-12T00:45:15+5:302020-08-12T00:45:59+5:30
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमालीची डोकेदुखी झाली आहे. सण, उत्सव साजरे करताना सामाजिक अंतराचे भान राखले जावे, यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.
अलिबाग : धार्मिक सण कशा प्रकारे साजरे करावेत, याबाबतही कोरोनाने नवे आयाम घालण्यास सर्वांनाच भाग पाडले आहे. त्याचाच विपरित परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील सुमारे ७०० दहीहंड्यांसह मिरवणुकाही रद्द कण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमालीची डोकेदुखी झाली आहे. सण, उत्सव साजरे करताना सामाजिक अंतराचे भान राखले जावे, यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्यांचा आधार घेत साजरा केला जातो. गावातील देवळांमध्ये गावकरी एकत्र येऊन श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात, तसेच प्रसाद म्हणून गूळ-पोहे, सुंठवडा, चण्याच्या भाजीचा नैवद्य दाखवून तो येणाऱ्यांना दिला जातो. मात्र, या वर्षी जिल्हाभरात घरीच पाच माणसांत हा उत्सव साजरा होणार आहे.
‘सर सलामत, तो पगडी पचास’ असे म्हणत दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी रद्द केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याचे स्वास्थ्य बिघडले असताना, दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे हा एकमेव पर्याय आहे. अशा वेळी दहीहंडीसारख्या मानवी मनोऱ्यांचा खेळ कसा खेळणार, शासनाच्या सूचना असताना, गोविंदांची एकत्र येण्याची जबाबदारी कशी घेणार, असे अनेक प्रश्न उभे राहिल्याने हा उत्सव अगदी साधेपणाने रायगडात करण्यात येणार आहे, तसेच या खेळाचे आयोजन केल्यास पोलीस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे, पोलीस विभागाला सहकार्य करण्यासाठी जिल्ह्यातील दहीहंडी आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे निर्णय
गोविंदा रे गोपाळा म्हणत दरवर्षी कोकणासह महाराष्ट्रातील विविध शहरांत गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, रोहा, महाड आदी ठिकाणी मानाच्या दहीहंडी बांधण्यात येतात, या हंड्या फोडण्यासाठी विविध ठिकाणांहून दहीहंडी पथके येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, हा सण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शांततेत साजरा करण्याचे आवाहन
रायगड जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला उत्सव शांततेत पार पडण्यासाठी ११ पोलीस अधिकारी, १८० पोलीस कर्मचारी, २५५ होमगार्ड तर ३ आर. सी. प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत, तसेच नागरिकांनी अगदी शांततेत उत्सव साजरा करावा, असे अवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.