जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान

By निखिल म्हात्रे | Published: February 16, 2024 08:00 PM2024-02-16T20:00:33+5:302024-02-16T20:01:28+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आले सोडत

71 disabled beneficiaries of the district will get a mobile shop | जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान

जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान

निखिल म्हात्रे/अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगार प्राप्त होऊन ते स्वावलंबी व्हावेत या उद्देशाने त्यांना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (ई-टेम्पो, मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, २८९ दिव्यांग बांधवांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले होते. यापैकी ७१ दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळणार असून, शुक्रवारी (दि.१६) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली.

शासकीय मूकबधिर विद्यालयातील इयत्ता पहिली मधील विद्यार्थी आदर्श बुधे या मुलाच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.
रायगड जिल्हा परिषद ही दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी सातत्याने विविध योजना, उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते.

जिल्हा परिषदेच्या फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, २८९ दिव्यांग बांधवांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले होते. यामधील ५७ अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले. उर्वरित २३२ अर्जांमधून तालुकास्तरावरुन आलेल्या अर्जांच्या संख्येनुसार तालुक्याचा कोटा निश्चित करुन, सोडत पद्धतीने चिठ्ठ्या काढून ७१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, जिल्हा समाजकल्याण अधिकारी शामराव कदम, जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देवमाने उपस्थित होते.

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेतंर्गत अलिबाग तालुक्यातील ९ दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार असून, पेण ७, पनवेल ३, उरण ३, कर्जत ७, खालापूर ३, सुधागड ३, रोहा ६, मुरुड ३, माणगाव ७, तळा ३, श्रीवर्धन ५, म्हसळा १, महाड ८, पोलादपूर ३ दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार आहे.

पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (ई-टेम्पो, मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे आहे. सदर ई-टेम्पो लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने डिजाइन करण्यात येणार आहे. फिरत्या वाहनावरील दुकानामुळे दिव्यांगांना रोजगार प्राप्त होणार आहे.

Web Title: 71 disabled beneficiaries of the district will get a mobile shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.