नेरळ : कर्जत तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण, दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवते. मार्च महिना सुरू झाल्याने टंचाईच्या झळा आदिवासी भागात तीव्र होत आहेत. यंदा पाणीटंचाई कृती आराखड्यात ३९ गावे आणि ५७ आदिवासीवाड्यांचा समावेश असून, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आणि विंधण विहीर खोदण्यासाठी ७२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.तालुक्यात ५००० मिली पाऊस पडूनदेखील पाणी साठवणुकीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. तालुक्यातून वाहणाऱ्या तीन प्रमुख नद्यांपैकी दोन उन्हाळ्यात कोरड्या पडतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मार्च महिन्यापासूनच जाणवू लागते. पाणीटंचाईमुळे ग्रामीण, दुर्गम भागातील नागरिकांना भटकंती करावी लागते. यामध्ये विशेषत: महिलांचे हाल होतात. दरवर्षी शासनाकडून टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येतो. डिसेंबर २०१८ मध्ये आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार अविनाश कोष्टी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी, पाणीपुरवठा उपअभियंता आर. डी. कांबळेआदी मान्यवर यावेळी उपस्थितहोते.तालुक्यातील नळपाणी योजना यांची सद्यस्थिती आणि प्रगतिपथावर असलेल्या नळपाणी योजना यांची माहिती घेण्यात येऊन त्याआधारे कर्जत तालुका पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात तालुक्यातील ३९ गावांना आणि ५७ आदिवासीवाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याच वेळी पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधण विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षी कर्जत तालुक्यात चार शासकीय टँकरच्या माध्यमातून सहा गावे आणि २४ आदिवासीवाड्यांत पाणी पुरविण्यात आले होते, तर अनेक गावांत ग्रामपंचायत स्तरावरून टँकर पुरविले गेले होते.पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश असलेल्या गावे आणि वाड्यांतील टँकरची मागणी करणारे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करून टँकर सुरू केले जातील. गतवर्षी मागणी केली त्यांना टँकरचे पाणी पुरविले आहे.- अविनाश कोष्टी,तहसीलदार, कर्जत
कर्जतमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ७२ लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 2:39 AM