- निखिल म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना महामारी काळ सुरू असतानाही बालकांना आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. आरोग्य प्रशासनाकडे लसीचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना महामारी सुरू असताना एकही मुलगा लसीपासून वंचित राहिलेला नाही.
शून्य ते पाच वर्षीय बालकांना तसेच दहा वर्षे, सोळा वर्षे मुलांना कोणत्याही आजाराने धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक लस दिली जाते. यामध्ये बीसीजी, हिपॅटायटिस-बी, ओपीव्ही ३, रोटा व्हायरस लस, गोवर, व्हिटॅमिन ए, पेंटा ३, डीपीटी, टीडी, मसल्स पहिला, दुसरा डोस, प्रतिबंधात्मक इंफॅट्स, विटा १, टीडीटी या लसी दिल्या जातात. ग्रामीण भागासह शहरातील बालके आणि मुलांना या लसी वयोमानानुसार दिल्या जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये बीसीजी (७४ टक्के), पेंटा ३ (८० टक्के), ओपीव्ही ३ (७९ टक्के), विटा १ (६९ टक्के), मसल्स पहिला डोस (८७ टक्के), फुल्ली प्रोटेक्ट इंफॅट्स (७९ टक्के), डीपीटी बी (८९ टक्के), ओपीव्ही बी (८९ टक्के), मसल्स दुसरा डोस (८५ टक्के), डीपीटी ५ वर्षे बालक (७७ टक्के), टीडी १० वर्षे मुले (२८ टक्के), टीटीडी १६ वर्षे मुले (२७ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.कोरोना काळातही कोणीही बालक आणि मुले ही लसीपासून वंचित राहिलेली नाहीत. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत लागणाऱ्या लसीचा आणि औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तसेच इतर आजारांबाबतही औषधसाठा मुबलक असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांनी दिली. २०२०-२१ या वर्षाचे लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेने पूर्ण केले आहे. कोरोना महामारी मार्च महिन्यापासून सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा या आजारावर मात करण्यासाठी झटत आहे. असे असले तरी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण अभियानात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कमी पडलेली नाही. जिल्ह्यातील कोणतेही बालक आणि मूल कोरोना काळात लसीकरणापासून वंचित राहिलेले नाही. कोरोनाबाधित क्षेत्रातील बालकांना आणि मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात बोलावून त्यांचे लसीकरण केले असल्याची माहिती लसीकरण विभागाच्या परिचारिका विजया भोसले पाटील यांनी दिली आहे.