हेमंत शिबिरात ७५० स्वयंसेवक सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2015 02:53 AM2015-12-28T02:53:28+5:302015-12-28T02:53:28+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे हेमंत शिबिर २०१५चे उद्घाटन कर्जतमध्ये करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात जिल्ह्यातील अलिबाग,
कर्जत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे हेमंत शिबिर २०१५चे उद्घाटन कर्जतमध्ये करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात जिल्ह्यातील अलिबाग, उरण, पनवेल, पेण, रसायनी, खालापूर आणि कर्जत अशा सात तालुक्यांतील सुमारे ७५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
शहरातील रेल्वेपुलाजवळ नाना मास्तर नगर मुद्रे येथे खुल्या मैदानावर राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. मैदानाच्या प्रवेशव्दारास बळीराम गायकवाड यांचे नाव देण्यात आले आहे. नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या हेमंत (समरता) शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कुलाबा जिल्हा संघचालक मनोहर ओझे, संघाचे जिल्हा कार्यवाहक सुनील पाटील, शिबिरप्रमुख सुजित टिळक, बौद्धिकप्रमुख विवेक कुलकर्णी, रक्षकप्रमुख विनायक सिघण, रायगड विभाग संघचालक यशवंत पाटील, कर्जत तालुका संघचालक विनायक चितळे, शिबिर व्यवस्थापक मिलिंद कोशे आदी उपस्थित होते.
शिबिराच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार घडतील, असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी व्यक्त केला. शिबिरात दामू अण्णा आठवले यांच्या नावाचे सामाजिक समरता प्रदर्शन भरण्यात आले आहे. (वार्ताहर)