मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : वाढवण बंदराच्या पायाभरणीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने एसटीच्या १२० बस, तर ८० खासगी बस भाड्याने घेतल्याचे समोर येत आहे. अवजड माल वाहतूक बंद केल्याने ७५०० कंटेनर मालाचे ट्रेलर्स पार्किंग करून ठेवण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील ७६ हजार २०० कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. एसटी महामंडळाची मदत घेत ५५ रुपये प्रतिकिमी दराने १२० बस भाड्याने घेतल्या. रायगड विभागातून ४५, मुंबई सर्कलमधून ८,परेल विभागातून १२, पनवेल विभागातून २२, कुर्ला विभागातून १२ बसेसचा समावेश होता.
उरण हद्दीत तब्बल ५००० कंटेनर ट्रेलर केले पार्कमोदींच्या सभेसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी गुरुवारपासूनच जेएनपीए परिसरातील सीएफएस, कंटेनर यार्डचालकांची तातडीने बैठक घेत अवजड कंटेनर वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे जेएनपीए परिसरात सुमारे ५००० कंटेनर ट्रेलर पार्किंग करून ठेवण्यात आल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली. उरण हद्दीतही असे तब्बल २५०० कंटेनर उभे असल्याची माहिती उरणचे उपपोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.
कार्यक्रम संपताच कामकाज पूर्ववत गुरुवारी दुपारपासूनच कंटेनर वाहतूक बंद झाल्याने जेएनपीए बंदरातील कामकाजावर खूप परिणाम झाला. मात्र बंदरातील ऑपरेशन्स विभागातील कामावर फारसा परिणाम झालेला नाही. शुक्रवारी रात्रीपासून कंटेनर वाहतूक सुरळीत होऊन कामकाजही पूर्ववत होईल, असा दावा जेएनपीए वाहतूक विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक एस. के. कुलकर्णी यांनी केला.
इतर शहरांमधूनही खासगी बससह इतर लहान वाहनांची सोयदेखील जेएनपीएने केल्याची माहिती समोर येत आहे. उरण परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, झोपडपट्टीतील कामगार यांना कार्यक्रमस्थळी आणले गेल्याचे चित्र दिसत होते. काही खासगी वाहनांतून दहा-दहा जणांना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचेही दिसून आले.