जेएनपीए परिसरात ७५००० ट्रेलर्सचा विविध रस्त्यांवर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:32 PM2024-01-02T19:32:59+5:302024-01-02T19:33:10+5:30
बंदरातील आयात निर्यात ठप्प : रस्त्यांवर शुकशुकाट.
मधुकर ठाकूर, उरण : केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी नव्याने तयार केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरातील वाहन चालकांच्या आंदोलनामुळे जेएनपीए परिसरात ठिकठिकाणी सुमारे पाऊण लाखांहून अधिक वाहने विविध रस्त्यावर उभी आहेत. तर देशातील नंबर वन बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंदरातील ६० टक्के मालवाहतूक ठप्प झाली आहे.सोमवारपासुन बंदरातील आणि परिसरात असलेल्या १२५ कंटमालाची आयात-निर्यातच कोळमडल्याने शेकडो कोटींचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
हिट अँड रन कायद्याविरोधात वाहनचालक रस्त्यावर उतरले असल्याने जेएनपीए अंतर्गत बंदरांवर आधारित असलेल्या १२५ सीएसएफ आणि कंटेनर यार्डातील कामकाज पुरते ठप्प झाले आहे.यामुळे द्रोणगिरी नोड, पंजाब कॉन्वेअर,आयओटीएल आदी परिसरात सुमारे ७० हजार कंटेनर ट्रेलर्स उभे असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी दिली.विविध रस्त्याच्या कडेला दुतर्फा हे कंटेनर ट्रेलर्स उभे करण्यात आले आहेत.तर जेएनपीए परिसरातील विविध रस्त्यांवर दोन हजारांहून अधिक कंटेनर उभे असल्याचे न्हावा -शेवा बंदर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर यांनी सांगितले.कंटेनर मालाची वाहतूकच ठप्प झाल्याने जेएनपीए अंतर्गत असलेल्या पाचही बंदरातील आयात निर्यातीचे काम ६० टक्क्यांपर्यंत थांबले आहे.परिणामी शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.वाहनचालकांच्या आंदोलनामुळे रेती, माती आणि इतर वाहतूकही बंद असल्याने बांधकाम व्यावसायही अडचणीत आला आहे.
दरम्यान मंगळवारी पोलिसांनी बंदरात मालवाहतुक करणाऱ्या वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याची सूचना केली असल्याची माहिती न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.