लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन कार्यक्रम जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड रायगड-अलिबाग येथे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते. होमगार्ड व नागरी संरक्षण दिन वर्धापन दिन सप्ताहाच्या होमगार्डच्या संचलन कार्यक्रमामध्ये प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मानवंदना देणेत आली. यावेळी होमगार्डसनी शानदार संचलन सादर केले.
संचलनामध्ये होमगार्डचे दोन प्लाटुन सहभागी झाले होते. संचलनाचे नेतृत्व कंपनी नायक - नरेंद्र पाटील यांनी केले. त्यांना सहाय्यक म्हणुन वरिष्ठ पलटन नायक चंद्रकांत धनवटे, प्लाटुन क्रमांक-1 चे प्रमुख पलटन नायक- निलेश पाटील व सुपर नंबरी पलटन नायक अनिल राणे, प्लाटुन क्रमांक-2 चे प्रमुख पलटन नायक- एस. एस. अंतुले व सुपर नंबरी पलटन नायक-राजा नजे हे अधिकारी संचलनात सहभागी होते.
जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी निष्काम सेवेच्या भावनेने प्रेरीत होऊन होमगार्डसनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. तसेच होमगार्ड व नागरी संरक्षण दिन वर्धापन दिना सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी होमगार्ड बजावत असलेल्या कार्याचा आढावा घेऊन होमगार्डसनी केलेल्या कामाचे कौतुक केले व होमगार्ड संघटनेस पोलीस विभागाकडुन सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या होमगार्डसना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हातील 15 पथकांमधुन अधिकारी व होमगार्ड तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रभारी केंद्र नायक, होमगार्ड रायगड गणेश कदम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशासिक अधिकारी सुभाष धापटे यांनी केले.