अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. ८२ जागांसाठी २४६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. सुमार ७७.०२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. सोमवारी सकाळी १० वाजता त्यात्या तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप आणि भाजपा यासारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांची राजकीय प्रतिष्ठा या नगर पंचायतीच्या निवडणुकीत लागली आहे. बलाढ्य पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचारामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. विकासावर सुरुवातीला सर्वच राजकीय पक्षांनी भाष्य केले मात्र नंतर त्यांच्यामधील तोल सुटत गेला. त्यामुळे विकासाचे मुद्दे बाजूलाच पडल्याचे जाणवले. राजकीय सत्तेची महत्त्वाकांक्षा इतक्या थराला गेली की, शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस असा राडा तळा तालुक्यात शुक्रवारी रात्री झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले आहे. या हाणामारीमुळे नगरपंचायतीला काही प्रमाणात गालबोट लागले.तळा, म्हसळा, माणगाव, पोलादपूर आणि खालापूर या पाच नगर पंचायतींमध्ये ३१ हजार ८९१ मतदार आहेत. त्यामध्ये १६ हजार ८९ पुरुष, तर १५ हजार ८०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. सकाळी साडेसात वाजता सुरु झालेल्या मतदानाला मतदारांनी सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद दिला. दुपारी प्रतिसाद मंदावला होता. दुपारनंतर पुन्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. पोलादपूरमध्ये प्रभाग क्रमांक १५ मधील मतदान यंत्र काही तांत्रिक कारणाने बदलण्यात आले. तळा तालुक्यात ७७.५३ टक्के मतदान पार पडले होते. त्याचप्रमाणे म्हसळा (७०.०५ टक्के), माणगाव (७४.८० टक्के), पोलादपूूर (७७.७१ टक्के) आणि खालापूर येथे ८९.९७ टक्के अशा एकूण ७७.०२ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वत्र मतदान शांततेत पार पडले असल्याची, माहिती जिल्हा प्रशासनातील नगर पालिका विभागाचे अधिकारी ए.जी.तडवी यांनी दिली. (प्रतिनिधी)खालापूरमध्ये शांततेत निवडणूक१खालापूर : नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी मतदान झाले. नव्याने अस्तित्वात आलेल्या या नगरपंचायतीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावली असून येथे खरा सामना शिवसेना व शेकापमध्ये होताना दिसला. ८९.९७ टक्के मतदानाची नोंद झाली.२मनसे, भाजपा व राष्ट्रवादीकडून सर्व १७ उमेदवारही येथे उभे करण्यात आले नाहीत. शिवसेनेने सर्व १७ जागांवर उमेदवार दिले असून शेकाप जोमाने मैदानात उतरलेली येथे दिसली. राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी करीत फक्त ९ जागीच उमेदवार उभे केले होते.३ मनसे व भाजपाकडून काही प्रभागातच लक्ष केंद्रित केलेले दिसले. पंचायत समिती खालापूर छत्रपती सभागृहात सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरु होणार असून ११ वाजेपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
पाच नगरपंचायतींसाठी ७७ टक्के मतदान
By admin | Published: January 11, 2016 2:06 AM