- मधुकर ठाकूर
उरण : रायगड जिल्ह्यातील लोक कलावंतांना मागील १० महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाली आहे.त्यामुळे ७८५ वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
राज्याभरातील हजारो लोक कलावंत तमाशा, नाटक , भारुड, लावणी ,किर्तन, शाहिरी पोवाडे ,पोतदार अशा सर्व लोककला मोठ्या खुबीने आणि उत्तम प्रकारे सादर करतात. त्या-त्या प्रसंगाचे आणि वेळेचे औचित्य कलेत साठविलेले असते. या सार्या लोककला सादर करून नुसतेच मनोरंजन केले जात नाही तर त्यात समाजाचे भावनिक संबंध जोडलेले आहेत.या लोककलेतुन समाजाचे प्रबोधनही केले जाते. समाजातील चांगल्या चालीरीती, रितीरिवाज यांची भलावणच केलेली असते. त्या लोकांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत .एकंदरीत मनोरंजनाच्या दृष्टीने या लोककलांना फार महत्त्व आहे.जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अशा लोककलावंत व त्यांच्या वारसांना शासनाकडून दरमहा २२५० रुपये मानधन दिले जाते.
जिल्हापरिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मानधन लोककलावंत व त्यांच्या वारसांच्या बॅक खात्यांमध्ये थेट जमा केले जाते. मात्र रायगड जिल्ह्यातील वृद्ध कलावंत व त्यांच्या वारसांना मागील १० महिन्यांपासून मानधनच मिळणे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वृद्ध लोककलावंतांची संख्या सुमारे ७८५ आसपास आहे. जानेवारी २०२२ पासून वृध्द कलावंतांना देण्यात येणारे मानधन शासनाकडून देण्यात आलेले नाही.मात्र शासनाकडून मानधनाची रक्कम प्राप्त होताच वृध्द कलावंतांना थेट त्यांच्या खात्यावर पाठविण्यात येईल अशी माहिती रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाचे अधिकारी तात्यासाहेब नारुटे यांनी दिली.
उरणमध्ये १९ वृध्द कलावंत असुन त्यापैकी ६ जण मृत्यू पावले आहेत.मात्र त्यांच्या वारसांनाही मानधन दिले जाते.मात्र जानेवारीपासून त्यांना मानधन मिळाले नसल्याची माहिती उरण पंचायत समितीचे संबंधित विभागाचे अधिकारी शैलेश म्हात्रे यांनी दिली.
मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने आर्थिक ओढाताण होत आहे.त्यामुळे वृध्द कलावंतांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येऊन ठेपली असुन उपासमारीची पाळी आली आहे.प्रत्येक महिन्याला मानधन मिळाले तर अशी आर्थिक ओढाताण होणार नसल्याची खंत उरण तालुक्यातील तमाशा कलावंत कै. पांडुरंग म्हात्रे यांच्या वृध्द वारसदार पत्नी हिराबाई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.