जिल्ह्यातील ७८७ राजकीय बॅनर्स हटवले; पनवेलमध्ये सर्वाधिक ४२५ बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:43 PM2019-03-11T23:43:23+5:302019-03-11T23:43:44+5:30

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर

787 political banners deleted in the district; Most 425 banners in Panvel | जिल्ह्यातील ७८७ राजकीय बॅनर्स हटवले; पनवेलमध्ये सर्वाधिक ४२५ बॅनर

जिल्ह्यातील ७८७ राजकीय बॅनर्स हटवले; पनवेलमध्ये सर्वाधिक ४२५ बॅनर

Next

अलिबाग : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर होताच पुढील २४ तासांत राजकीय पक्षांकडून लावण्यात आलेले बॅनर्स, जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, झेंडे काढून टाकणे अपेक्षित असते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील ७८७ बॅनर्स व पोस्टर्स तत्काळ हटविण्यात आले आहेत.

पनवेलमधून सर्वाधिक ४२५ बॅनर्स हटवण्यात आले आहेत, तर अलिबाग ३२,पेण २५, मुरुड ९, उरण ४६, कर्जत १२, खोपोली ३४, रोहा ५३, महाड ४६, श्रीवर्धन ५७, म्हसळा ९, माणगाव ६, खालापूर १२, तळा १३ आणि पोलादपूरमधून ८ बॅनर्स हटवण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अन्य ठिकाणे व महामार्गावरील बॅनर्स हटवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिली. निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला आदी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक प्रचाराकरिता शासकीय संपत्तीचे विद्रूपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, खासगी संपत्तीचे विद्रूपीकरण, शासकीय वाहनांचा दुरु पयोग, जाहिरात, शासकीय संकेतस्थळावरील राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो प्रसिद्धी यास आचारसंहितेत बंदी करण्यात आली आहे. तसेच ज्या विकासकामांचे कार्यादेश निघून ती सुरू करण्यात आली आहेत, ती सुरू राहतील. मात्र जी विकासकामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाही, ती आचारसंहिता संपेपर्यंत सुरू करता येणार नाहीत. यात अतितातडीच्या कामांचा समावेश असल्यास त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने मतदार संघातील प्रचार सभांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात आहे. आचारसंहितेच्या काटेकोर पालनावर पथकाचे लक्ष राहील.

तक्रारींकरिता १९५० टोल फ्री क्रमांक
तक्रार निवारण कक्ष २४ तास सुरू राहणार असून जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचबरोबर मतदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रार करायची असल्यास, १९५० हा टोलफ्री दूरध्वनी क्रमांक २४ तास उपलब्ध आहे. निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, तसेच मतदारांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. पत्रकार परिषदेपूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेऊन निवडणूक कार्यक्र म व आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भात माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

रायगडमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान
रायगड लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानुसार गुरुवार २८ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी ५ एप्रिल रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ एप्रिल आहे. मतदान २३ एप्रिल होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रि या पूर्ण करण्याचा कालावधी २७ मेपर्यंत असून तोपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.

फ्लाईंग स्क्वॉड सज्ज
निवडणूक खर्च व आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता फ्लार्इंग स्कॉड तत्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकीसंदर्भात फ्लार्इंग स्क्वॉड तत्काळ कारवाईकरिता सज्ज आहे. निवडणुकीसंदर्भातील तक्र ारींकरिता यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

Web Title: 787 political banners deleted in the district; Most 425 banners in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग