- कांता हाबळेनेरळ : नेरळ - कशेळे - भीमाशंकर राज्यमार्ग क्रमांक १०३ साठी या मार्गावरील चढ, उतार सुधारणा करण्यासाठी आणि डांबरीकरणासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गाचे काम दोन टप्प्यांत सुरू करण्यात येणार आहे. त्याचवेळी कशेळे खांडस आणि नांदगाव फाटा-गणपती घाट या दोन टप्प्यांत रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण ही कामे करण्यासाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या राज्य मार्गाचे भूमिपूजन शुक्रवारी कशेळे येथे आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.नेरळ - कशेळे - कोटिंबे-भीमाशंकर या राज्यमार्गावरील नेरळ ते कशेळे या प्रमुख जिल्हा मार्गासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर दुसरा टप्पा कशेळे-कोटिंबे फाटा भीमाशंकर मार्गासाठी १ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्याचा ठेका मे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन वाशी यांना देण्यात आला आहे. दोन्ही रस्त्यांवरील असलेले चढ आणि उतारामध्ये सुधारणा करणे, आणि रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे.भूमिपूजनाच्या अगोदरच कामाला सुरुवात करण्यात आली असून नेरळ-कशेळे मार्गावर चढ-उतार यामध्ये सुधारणा करण्याच्या कामाला सुरु वात करण्यात आली आहे. हे रस्ते चांगल्या दर्जाचे झाले तर यामुळे होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच लागणाऱ्या वेळेची बचत होईल आणि कमी वेळात १२ किमीचे अंतर पार करता येणार आहे. ठेकेदाराला कामासाठी ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.नेरळ-कशेळे, भीमाशंकर मार्गासाठी ४ कोटी ९० लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत. निधी मंजूर होऊनही चांगल्या दर्जाचे रस्ते होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकारी यांनी रस्त्यावर उभे राहून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे लागणार आहे. जनतेने आणि वाहनचालकांनी डांबरीकरण सुरू असताना थांबून सहकार्य करणे गरजेचे आहे. यात दर्जेदार कामाची निर्मिती होईल.- सुरेश लाड, आमदारनेरळ-कशेळे-कोटिंबे फाट्यापर्यंत संपूर्ण रस्त्यासाठी ४ कोटी ९० लाख रु पये मंजूर झाले आहेत. कामाची निविदा पूर्ण झाली असून ठेका देण्यात आला आहे. या रस्त्यावरील चढ-उतार काढून डांबरीकरण करण्यात येणार आहे. या १२ किलोमीटर रस्त्यावर चढ-उतारामुळे जो वेळ लागत होता, त्या वेळेची बचत होणार असून एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.- गोरक्ष गवळी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत