म्हसळ्यातील ८ गावे २३ वाड्या टंचाईग्रस्त; शासनाची १८.६ लाखांची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 11:10 PM2018-12-29T23:10:47+5:302018-12-29T23:11:27+5:30
मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो.
म्हसळा : मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो.
यामध्ये आक्टोबर ते जून या कालावधीत येणारी संभाव्य पाणीटंचाई व कोणत्या पद्धतीने उपाययोजना करायच्या, तो आराखडा असतो. तालुक्यातील आठ गावे व २३ वाड्यांच्या टंचाई आराखड्यात समावेश करण्याचे समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड यांना कळविले आहे.
सदर समितीत आमदार, सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हे सदस्य आहेत. तालुक्यातील आठ गावे व २३ वाड्यांना टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने रुपये १८.६ लाखांची तरतूद केली आहे.
टंचाई आराखडा करण्यापूर्वी टंचाईग्रस्त गावांच्या प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, संबंधित योजनेला पूरक योजना करणे, योजनेची विशेष दुरुस्ती करणे, वापरात असणाऱ्या विंधण विहिरी दुरुस्त करणे, स्थानिक विहिरी अधिग्रहित करणे, असे विविध पर्याय वापरल्यानंतर संबंधित गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे समितीच्या माध्यमातून सुचविण्यात येते.
आराखड्यातील गावे
१) कुडगाव कोंड, २) गायरोणे, ३) तुरुंबाडी, ४ ) रोहिणी, ५) आडी ठाकूर, ६) घुम, ७) खारगाव (बु.), ८) खारगाव (खु.)
वाड्या - १) चंदनवाडी (केलटे), २) सांगवड (ठाकरोली), ३) लेप गौळवाडी, ४ ) वाघाव बौद्धवाडी, ५) कृष्णनगर (खामगांव ), ६) बेटकरवाडी (पाभरे), ७) दगडघूम (निगडी), ८) निगडी मोहल्ला, ९) चिचोंडे (पाभरे), १०) सुरई (खारगाव बु.), ११) घाणेरी कोंड (कोळवट), १२) पानवे (केलटे), १३) आगरवाडा बौद्धवाडी, १४) आगरवाडा (आगरी वाडी), १५) तोराडी कुणबी वाडी, १६) तोराडी आदिवासी वाडी, १७) खामगाव गौळवाडी, १८) खामगाव सोनघर, १९) खामगाव मोहल्ला, २०) ताम्हणे शिर्के , २१) सकलप (खारगाव खु.), २२) तोंडसुरे जंगमवाडी, २३) जिजामाता हायस्कूल (वरवठणे)
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत विंधण विहीर कार्यक्रमाची परिपूर्ण पूर्तता झालीच नाही, तीच परिस्थिती म्हसळा तालुक्याची आहे. अनेक वेळा निधी वर्ग होत नाही, तर म्हसळ्यासारख्या दुर्गम तालुक्यात बोअरिंगचे मशीन पॉइंटवर मार्ग नसल्याने पोहोचत नाहीत ही मागील स्थिती आहे. तर बहुतांश गावांना मुुबलक निधी येऊनही सर्व ठिकाणी कामे सदोष झाल्याने तालुक्याला टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
- महादेव पाटील,
माजी सभापती, पं.स. म्हसळा