ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख सह ८० जण ताब्यात
By राजेश भोस्तेकर | Published: January 5, 2024 11:39 AM2024-01-05T11:39:21+5:302024-01-05T11:41:31+5:30
शासन आपल्या दारी कार्यक्रम वेळी करणार होते आंदोलन, पोलिसांनी पहाटे केली अटक
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: शासन आपल्या दारी या कार्यक्रमावेळी ठाकरे गटातर्फे आंदोलन करून मुख्यमंत्री याना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रमात बाधा येण्याची आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी १०१ अन्वये जिल्हाप्रमुख अनिल नवगणेसह ८० जणांना पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना घरातून उचलून अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट पसरली आहे.
शुक्रवारी ५ जानेवारी रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमा वेळी ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काही दिवसापूर्वी शिंदे आणि ठाकरे गटात महाड येथे तंटा झाला होता. त्यामुळे दोन्ही गटातील वातावरण तंग झाले आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने रायगड पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिक यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन कोणतेही कृत्य करू नका अशा नोटीस दिल्या होत्या.
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम दुपारी साडे बारा वजनाच्या सुमारास आहे त्यापूर्वीच शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यासह ८० जणांना घरातून ताब्यात घेतले आहे.