कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान रविवारी शांततेत पार पडले. थेट नगराध्यक्षपदासाठी दोन आणि १८ सदस्यपदांसाठी ४३ असे ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळपासून शांततेत मतदान सुरू झाले. सुमारे ८० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवार, २८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.२२ हजार ८६३ मतदार असलेल्या कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी थेट नगराध्यक्ष आणि १८ सदस्य निवडण्यासाठी मतदान घेतले असून, ईव्हीएम मशिनद्वारे मतदानाला सकाळी ९ प्रभागांतील ३१ मतदान केंद्रांवर सुरु वात झाली. सुरु वातीला प्रभाग एक मधील दोन क्र मांकाच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन वेळेत सुरू न झाल्याने त्या केंद्रावर सुमारे २० मिनिटे उशिरा मतदानास सुरुवात झाली.भिसेगाव, गुंडगे, दहीवली, मुद्रे, आकुर्ले या भागात मतदारांनी गर्दी केली होती. शहरी भाग असलेल्या बाजारपेठ परिसरात मतदारांचे प्रमाण कमी होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा सुरेश लाड यांनी प्रभाग तीन मध्ये तर शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी यांनी प्रभाग आठ मध्ये मतदान केले.मतदान प्रक्रि येदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी २६ जानेवारी रोजी सायंकाळी पोलिसांनी शहरातील सर्व भागात रूट मार्च केले. रायगड पोलिसांचे राज्य राखीव कृती दलाची एक तुकडी आणि ९६ पोलीस कर्मचारी असे १२६ पोलीस कर्मचारी, तसेच ९ पोलीस अधिकारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवून होते.
कर्जतमध्ये ८० टक्के मतदान; आज मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:09 AM