विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ३ मे रोजी तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी आजही मोठ्या उत्साहाने जोपासत आहेत. कोकणात या प्रथेला गावपळण असे म्हणतात. याच तालुक्यातील राबगाव गावामध्ये देखील अशी रीघवनीची प्रथा होती, परंतु आता गावाची लोकसंख्या वाढल्याने त्यांनी ती प्रथा बंद केली. दर नऊ वर्षांनी येणाऱ्या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव गुराढोरासह सोडतात. गावाबाहेर वेशीवर शेतात तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या करून साधारण तीन दिवस राहतात. गावात पूर्णत: शुकशुकाट असतो.
ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी ७ वाजता बाहेर पडले आहेत. साधारण ३५झोपड्या बांधल्या आहेत. गावातील अंदाजे ३०० आबालवृद्ध व तरुण तेथे राहत आहेत. शनिवारी रात्री गावात प्रमुख लोक जाऊन मानपान आणि पारंपरिक विधी करणार आहेत. त्यानंतर रविवारी ५ मे रोजी सर्व गावकरी पुन्हा आपापल्या घरी जाणार आहेत. अशी ही जुनी प्रथा आजही जोपासली जात आहे. सध्याच्या तरुण पिढीला हा युक्तिवाद पटत नाही. तरीसुद्धा ते मोठ्या हिरिरीने या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
या गावात उच्चविद्याविभूषित आणि प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. ते सांगतात की, तीन दिवस गाव मोकळे राहिल्यामुळे प्रदूषण, रोगराई अशा काही गोष्टी गावात असतील तर त्यांचा नायनाट होतो. लोक मोकळ्यावर जाऊन राहतात, तिथे त्यांना वेगळे शेजारी लाभतात. त्यातून एकी निर्माण होते. एक इव्हेंट म्हणून आता हे साजरे केले जाते. निमित्त जरी रीघवनीचे असले तरीसुद्धा जशी शहरांत माणसे आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवस बाहेर जातात, तसेच येथील प्रजा बदल म्हणून गावाबाहेर जाऊन राहते. यात अंधश्रद्धा अजिबात नाही, तर एका पुरातन परंपरेचे काटेकोरपणे जतन करीत असल्याचे येथील ग्रामस्थ प्रमोद खरिवले यांनी सांगितले. पूर्वीच्या लोकांचा उद्देश हाच असेल की रोगराई, प्रदूषण यापासून गाव तीन दिवस मुक्त व्हावा आणि नंतर परत नव्या उत्साहाने शुद्ध हवेत येऊन राहावे.
आजही मोठ्या उत्साहाने ‘रीघवनी’ची ही परंपरा जपली जाते. ग्रामदैवत श्रीरामेश्वरावर येथील लोकांची नितांत श्रद्धा आहे. पूर्वी गावात साथीचे रोग आल्यावर त्या रोगांचे विषाणू-जीवाणू प्रसार होऊ नये म्हणून सर्व लोक गावाबाहेर यायचे. मात्र त्यानंतर याला भूतप्रेत ही अंधश्रद्धा जोडली गेली. मात्र आम्ही तरुणांनी या परंपरेचे कारण पूर्वीचे साथीचे रोग असल्याचे शोधले आहे. या पाठीमागे कोणती भीती किंवा अंधश्रद्धा किंवा अघोरी प्रथा नाही. - किशोर खरीवले, उपसरपंच, बलाप