कर्जत : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २८ आॅक्टोबरला होत आहेत. ४२ जागांसाठी निवडणूक होणार आहे, मात्र त्यातील सहा जागा बिनविरोध झाल्याने ३६ जागांसाठी ८१ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. तर पोटनिवडणुक होत असलेल्या दोन जागांसाठी केवळ एक अर्ज आला असून, तेथे एक जागा पुन्हा रिक्त राहिली आहे. अन्य जागेवर अनंता मारु ती भुंडेरे हे बिनविरोध निवडून आले आहेत.नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५५ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले. सहा जागांवर एकेक अर्ज राहिल्याने त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित ३६ जागांसाठी २८ आॅक्टोबरला मतदान घेतले जाणार आहे. तालुक्यातील कडाव, वैजनाथ, दामत-भडवळ, भिवपुरी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या सर्व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दाखल नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी संपली असून, आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक होत असलेल्या चार ग्रामपंचायतींमधील सहा जागांवर एकमेव उमेदवार राहिले असल्याने त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक पाच जागा दामत-भडवळ ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध झाल्या आहेत. तेथील प्रभाग एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवर अजमल कादीर तांबोळी आणि सर्वसाधारण महिला राखीव जागेवर तंजिला इरफान नजे या बिनविरोध निवडून आल्या असून, तेथील एका जागेवर आता दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे.प्रभाग दोनमधून अल्मास असगर खोत, शबनम समीर पौंजेकर हे दोन्ही उमेदवार सर्वसाधारण जागांवर आणि रिझवान मैनुदीन तांबोळी हे नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव जागेवर बिनविरोध झाले आहेत. आता तेथील ८ जागांवर २२ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. दामत भडवळमधील १० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. बाचकर यांनी दिली. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कडावमध्ये पाच प्रभागांतील १२ जागांसाठी २४ उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग दोनमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवर नंदिनी पवाळी या बिनविरोध निवडून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. जे. बेडसे यांनी दिली. कडावमध्ये तब्बल २२ उमेदवारांनी माघार घेतली. वैजनाथ येथे दाखल अर्जांपैकी १८ उमेदवारांनी माघार घेतली आहे, तरी आता सर्व ९ जागांसाठी १८ उमेदवारांमध्ये सरळ लढत होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए. बी. गायकवाड यांनी दिली. भिवपुरी या टाटा पॉवर हाऊस असलेल्या भागातील ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जांपैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली असून, सर्व सात जागांसाठी १७ उमेदवारांमध्ये निवडणूक होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. आर. पाटील यांनी दिली.हुमगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २३ एप्रिलला होती. त्यावेळी तेथील दोन जागा जातपडताळणी नसल्याने रिक्त राहिल्या होत्या. त्या दोन जागांसाठीदेखील पोटनिवडणूक होत असून, निवडणूक निर्णय अधिकारी पी. पी. नवाले यांच्याकडे त्यापैकी केवळ एकाच जागेसाठी नामांकन अर्ज दाखल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हुमगावमधील एक जागा रिक्त राहणार आहे. (वार्ताहर)
कर्जतमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८१ उमेदवार रिंगणात
By admin | Published: October 17, 2015 11:42 PM