८४ गावांना अशुद्ध पाणीपुरवठा
By Admin | Published: October 13, 2015 02:07 AM2015-10-13T02:07:22+5:302015-10-13T02:07:22+5:30
शहरी भागात शुध्द पाणीपुरवठा होत असतानाच ग्रामीण परिसरातील जनतेवर अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे.
पेण : शहरी भागात शुध्द पाणीपुरवठा होत असतानाच ग्रामीण परिसरातील जनतेवर अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. पेणच्या खारेपाट विभागासह जीते, हमरापूर, दादर व खरोशी-पुरशेत या सर्वच विभागांना गेले तीन-चार महिने अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा हेटवणे धरणातून होत आहे.
धरणातील विनाप्रक्रिया केलेले (रॉ वॉटर) पाणी आहे तसे पेणच्या रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पुरवित आहे. तब्बल २९ ग्रामपंचायत क्षेत्रातील ८४ गावातील एक लाख लोकवस्तीमधील नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पेणमध्ये हेटवणे धरणाचे पाणी येथील नागरिकांना पिण्याचा मुख्य स्रोत आहे. गेल्या जून महिन्यापासून या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. मात्र मान्सून हंगामात छपरावरील पाणी गोळा करीत ते पिण्यासाठी वापरात आले. आता मान्सून संपल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. या समस्येचे निराकरण जलद गतीने व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील यांच्यासह २९ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी विभागवारी तक्रार अर्ज तहसीलदार पेण, गटविकास अधिकारी पेण व उपअभियंता ग्रामपंचायत पाणी पुरवठा डी. एन. खैरे यांना देवून देखील दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा थांबलेला नाही.
हेटवणे धरणातून येणारे पाणी कच्चे अर्थात प्रक्रिया न केलेले असल्याने ते शुद्ध करणारी यंत्रणाच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे नाही. अधिकारी पाणी वितरण यंत्रणेत कुठे बिघाड आहे याकडे लक्ष देत नाहीत. हेच पाणी सिडको नेते. मात्र त्यांचा अद्ययावत असा फिल्टरप्लॉन्ट जिते येथे कार्यान्वित आहे. ज्या विभागावर पाणीपुरवठा करण्याचा भार आहे त्या यंत्रणेने गेल्या सात - आठ वर्षे या समस्येवर अभ्यास केला नाही. सिडको प्रकल्प संस्थेने पाण्याबाबतचा अहवाल सिडकोकडून मागितला आहे, असे कार्यकारी अभियंता गाडे यांनी सांगितले.
हेटवणे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक घेवून समस्येवर उपाययोजना करत आली असती. मात्र अद्याप कोणतीह कारवाई झाली नाही. (वार्ताहर)