अलिबाग - रायगड जिल्ह्यातील ३५७ मतदान केंद्रांवर ९६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. २३० सरपंच आणि एक हजार ४५८ सदस्यपदाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. विविध राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे ग्रामीण राजकारणाच्या सिंहासनावर कोण बाजी मारणार, हे गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी मतमोजणीतून स्पष्ट होईल. पनवेल देवद ग्रामपंचायतीमध्ये दोन मतदान यंत्रे बंद पडली होती, तेथे नवीन मतदान यंत्रे देण्यात आली.जिल्ह्यात श्रीवर्धन तालुका वगळता, अन्य १४ तालुक्यांतील ३५७ मतदान केंद्रावर मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली. मतदारराजा मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. सकाळी मतदानाला चांगली सुरुवात झाली. ११.३० वाजेपर्यंत सरासरी ४० टक्के मतदान झाले होते. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच लगबग सुरू होती. मतदानासाठी महिलांनी विशेष गर्दी केली होती. वयोवृद्धांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारी उन्हाचा तडाखा प्रचंड असल्याने काही मतदारांनी बाहेर पडणे टाळले. त्यानंतर मतदार मोठ्या संख्येने आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी घराबाहेर पडले, त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.पनवेल तालुक्यातील देवद ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक तीन ‘अ’ मध्ये मतदान यंत्र बंद पडले होते. निवडणूक अधिकाºयाने ती तातडीने बदलून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली. अलिबाग तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ९६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ७२.४५ टक्के मतदान झाले होते. अलिबाग तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी ७६.४२ टक्के मतदान झाले. मुरुड तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी ७२.९७ मतदान पार पडले होते. पेण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी ६२.९२ टक्के मतदान झाले. पनवेल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी ७५.८७ टक्के मतदारांनी मत टाकले. उरण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी ७४.११टक्के मतदान झाले. कर्जत तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी ८३.२९ टक्के मतदान झाले. खालापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ८२.३७ टक्के मतदारांनी मतदान केले. माणगाव तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी ७६.१० टक्के मतदान झाले. तळा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी ५८.२३ टक्के मतदान झाले. रोहे तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींसाठी ७५.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुधागड तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी ३९.६८ टक्के मतदान झाले. महाड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी ७१.५७ टक्के मतदान झाले. पोलादपूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी ७७.०५ टक्के मतदान झाले, तर म्हसळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा समावेश होतो. येथे ६४.०४ टक्के मतदारांनी मतदान के ले.
रायगड जिल्ह्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी ८५ % मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:04 AM