- आविष्कार देसाईअलिबाग - बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे बालमन कोमेजून टाकणाऱ्यांच्या विरोधात सहायक आयुक्त कामगार यांनी, गेल्या तीन वर्षांत धाडी टाकून ८७ बालकामगारांची सुटका केली आहे. नवीन वर्षात रायगड जिल्ह्यातील बालकामगार कृतिदल अधिक आक्रमकपणे मोहीम राबणार असल्याने बालकामगारांना कामावर ठेवणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.रायगड जिल्हा हा विकासाचा जिल्हा आहे. येथे मोठ्या संख्येने कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प येऊ घातले आहेत. काही प्रकल्पांनी तर प्राथमिक कामाला प्रारंभही केला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आधीपासूनच तळोजा, रोहे, महाड, रसायनी येथे एमआयडीसीअंतर्गत प्रकल्प सुरू आहेत.जिल्ह्यातील शहरीकरणाबरोबरच नागरीकरणाचा आलेख वेगाने वर चढत आहे. त्या अनुषंगाने त्यांना पूरक असणाºया व्यवसायांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे-मोठे हॉटेल, किराणा मालाची दुकाने, गॅरेज, टायर पंचरची दुकाने, बांधकाम व्यवसाय अशा व्यवसायांमध्ये बालकामगारांना कामावर ठेवले जाते. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने कुटुंबाच्या संसाराला आधार म्हणून काही पालक आपल्या लहान मुलांना कामावर पाठवतात. तेथील आस्थापनांचे मालक त्या लहान मुलांकडून काम करून घेताना त्यांची पिळवणूक करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नीट नसल्याने त्यांना शिक्षणही घेता येत नाही.बालकामगार कामावर ठेवण्याची अनिष्ट प्रथा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखला. या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता सरकारने २५ एप्रिल २००६ रोजी सरकारी निर्णय पारीत केला. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर जिल्हा बालकामगार कृतिदल स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. त्यामार्फत मोठ्या संख्येने बालकामगारांची सुटका करण्यात कृतिदलाला यश आले आहे.जिल्हाभर धाडसत्ररायगड जिल्हा कृतिदलामार्फत डिसेंबर २०१६ अखेर ८६ धाडसत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सात हजार ७५० आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये १४ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ८४ बालकामगारांची सुटका करण्यात आली होती. २०१७मध्ये १५ ठिकाणी कृतिदलाने धाडी टाकून, तीन बालकामगांराची सुटका केली. सुटका केलेले बालकामगार हे कॅटरिंग, हॉटेल आणि टायरच्या दुकानात काम करीत असल्याचे आढळून आले होते, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी नीलेश देठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कठोर पावले उचलली जाणार२०१८ सालामध्ये गेल्या तीन महिन्यांत एकही धाडसत्र कृतिदलाने राबवलेले नसले तरी पुढील कालावधीत कृतिदल अधिक आक्रमक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.त्यामुळे या वर्षात कालबद्ध कार्यक्रम आखून जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये बालकामगार ठेवणाºयांविरोधात कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचेही, देठे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यातील बालकामगार ठेवण्याच्या अनिष्ट प्रथेचा बिमोड करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बालकामगार ठेवणाºयांना जिल्हा बालकामगार कृतिदलाचा सामना करावा लागणार एवढे मात्र निश्चितच आहे.
जिल्ह्यातून तीन वर्षांत ८७ बालकामगारांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:52 AM