-मधुकर ठाकूर
उरण : मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर जेएनपीएने ११ पैकी जसखार,नवघर, करळ-सावरखार,जासई या चार ग्रामपंचायतींना थकित असलेल्या मालमत्ता कराची ९ कोटी ६३ लाख ८० हजार ६७८ रुपये सोमवारी अदा करण्यात आली असल्याची माहिती जेएनपीएचे वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयंत ढवळे यांनी दिली.
जेएनपीए प्रकल्पबाधीत जसखार, सोनारी, करळ-सावरखार, फुंण्डे, डोंगरी,पाणजे, बोकडवीरा, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, पागोटे, नवघर आदी ११ ग्रामपंचायतींचा सुमारे कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. मागील अनेक वर्षांपासून कोट्यावधी रुपयांच्या थकलेल्या मालमत्ता करामुळे मात्र ११ ग्रामपंचायतीचा विकास पुरता थंडावला आहे.मालमत्ता कराची रक्कम वसूल करण्यासाठी ११ ग्रामपंचायतींच्या माध्यमातुन जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायत समितीचा संघर्ष सुरू असल्याची माहिती निमंत्रक तुकाराम कडू यांनी दिली.
जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायत समितीच्या संघर्षानंतर चार ग्रामपंचायतींच्या मालमत्ता कराची रक्कम सोमवारी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, मनिषा जाधव यांच्या उपस्थितीत अदा केली आहे. जसखार ग्रामपंचायत-२ कोटी ३६ लाख ६९ हजार ७७२ , नवघर-५९ लाख ८२ हजार ७७०,करळ-सावरखार- ४ कोटी ८३ लाख ५५ हजार ६५९,जासई -१ कोटी ८३ लाख ७२ हजार ४७७ अशी चार ग्रामपंचायतीची थकित असलेल्या मालमत्ता कराची ९ कोटी ६३ लाख ८० हजार ६७८ रुपये सोमवारी अदा करण्यात आली असल्याची माहिती जेएनपीएचे वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयंत ढवळे यांनी दिली.
उर्वरित ७ ग्रामपंचायतींची मालमत्ता कराच्या थकित असलेल्या २५ ते ३५ कोटींच्या रकमेच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायत समितीचा संघर्ष सुरू असल्याची माहिती निमंत्रक तुकाराम कडू यांनी दिली. मालमत्तेच्या थकित रक्कम अदा करण्यात आल्याने संबंधित ग्रामपंचायतींच्या विकास कामांना चालना मिळेल असा विश्वासही कडू यांनी व्यक्त केला आहे.