उरण : युरोपशी सागरी मार्गाने जोडणारा आणि अत्यंत जलद मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या सुएझ कालव्यात मालवाहू जहाज अडकल्याने या सागरी मार्गावरील जहाज वाहतूक पाच दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे या मार्गाने देशात येणारी सुमारे ३५० मालवाहू जहाजे अडकून पडली आहेत.
यामध्ये जेएनपीटी बंदरातून निघालेल्या ९ मालवाहू जहाजांचा समावेश असल्याची माहिती जेएनपीटी अधिकृत सूत्रांनी दिली.आशिया खंड- युरोप खंडाशी सागरी मार्गाने जलदगतीने जोडणारा सुएझ कालवा आहे. युरोप खंडात सागरी मार्गाने आफ्रिकेला वळसा घालून जाण्यासाठी १५ दिवसांचा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे जगभरातील मालवाहू जहाजे सुएझ कालव्यातूनच ये-जा करतात.
या अरुंद कालव्यातून दररोज ५० मालवाहू जहाजे मार्गस्थ होतात. २३ मार्चच्या सकाळी ७.४० वाजता एव्हरग्रीन कंपनीचे ४०० मीटर लांबीचे अवजड जहाज या सुएझ कालव्यात अडकून पडले आहे. त्यातच उठलेल्या वादळात हे जहाज तिरके झाले आहे. दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. यामुळे अडकून पडलेल्या मालवाहू जहाजाला गाळातून बाहेर काढण्यासाठी पाच दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अडथळे दूर होऊन सुएझ कालवा मालवाहतुकीसाठी पूर्ववत सुरू होईल. त्यासाठी केंद्र सरकारही याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.