रोजगारनिर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण; फळ लागवड मोहिमेतून मिळतो रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 10:55 PM2019-06-07T22:55:44+5:302019-06-07T22:55:51+5:30
मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला.
दत्ता म्हात्रे
पेण : फळ लागवड योजना रोजगार हमी योजनेस समाविष्ट केल्याने रायगड जिल्ह्यात या योजनेतून रोजगार उपलब्ध होण्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे.
कोकणात तसेच रायगडात रोजगार हमी योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता; परंतु रोजगार निर्मितीच्या अभावी फळबागाही लागवड योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन २ लाख ३८ हजार ९९३ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मजुरांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असताना देखील बाजारात मंदी असल्याने नाका कामगारांना मिळणारे ४०० ते ५०० रुपयांची मजुरीअभावी त्यांना माघारी परत फिरावे लागत होते. मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला. दिवसापोटी मिळणारे मजुरी काम नसलेल्या हंगामात त्यांना या योजनतून उपलब्ध झाली. दिवसाला २०० ते २५० रुपये मजुरीचा दर मिळाला व कामाचा ही एवढा मोठा ताण नसल्याने फळबाग लागवड योजनेचे कामात मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करता आले.
जिल्ह्याला रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी २ लाख ४७ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते दिलेल्या उद्दिष्टाच्या ९० टक्के भरते. जिल्ह्यात १३ हजार ३६५ मजुरांनी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची मागणी केली होती. त्यापैकी १२ हजार ६५६ मजुरांना रोजगार उपलब्ध झाले.
अकुशल कामगारांना काम
जिल्ह्यात औद्योगिकीकरण झालेले असताना कंपन्यांच्या साइटवर मिळणारा रोजगार अकुशल कामगारांसाठी मोठा आहे. परंतु कामाअभावी घरी बसण्यापेक्षा या योजनेत काम करण्यावर अकुशल मजुरांनी भर दिल्याने सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेला रोजगार निर्मिती करण्यात यश प्राप्त झाले.