मुरुडच्या दत्त देवस्थानाच्या महोत्सवाला ९२ वर्षांची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:54 PM2019-12-11T23:54:46+5:302019-12-11T23:54:49+5:30
इ.स. १९२७ मध्ये या ठिकाणी पहिली जत्रा भरविण्यात आली. १९९७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
आगरदांडा : स्वामी ब्रम्हेंद्र महाराज धावडशीकर यांनी, अठराव्या शतकात मुरुड-जंजिरा येथील टेकडीवर दत्तगुरूंच्या पादुकांची स्थापना केली.
इ.स. १९०७ च्या सुमारास जंजिरा संस्थानच्या सरन्यायाधीशपदी असलेल्या राजाध्यक्ष यांनी या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले. १९२६-२७ च्या सुमारास मंदिराचे कळस व सभागृहासह मंदिराचे बांधकाम करण्यात आले. इ.स. १९२७ मध्ये या ठिकाणी पहिली जत्रा भरविण्यात आली. १९९७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. श्री दत्त देवस्थान ट्रस्ट नोंदणीकृत आहे.
सुमारे ३५० मीटर उंचावर असलेल्या दत्तमंदिरात जाण्यासाठी ३०९ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या सभोवताली अडीच एकर मैदान असून, भक्तनिवासाचे काम प्रगतिपथावर आहे. ज्यांना पायºया चढणे शक्य नाही, अशांसाठी एक कि.मी. अंतर पार करून थेट दत्ताचे दर्शन घडू शकते.
दत्तजयंतीला यात्रेसाठी पंचक्रोशीतील तसेच श्रीवर्धन, म्हसळा व दिवेआगर या भागांतून मोठ्या संख्येने भक्त येत असतात.
मुरुडचे मनोहारी रूप खºया अर्थाने इथून पाहता येते. पूर्वेस अंबोलीचे महाकाय धरण तर मावळतीला अथांग अरबी समुद्र, या ठिकाणी जंजिरा व पद्मदुर्ग सागरी किल्ले इतिहासाच्या गतस्मृतींना उजाळा देतात. दत्तजयंतीनिमित्त बुधवारी सलग ३५ वर्षे कीर्तनाच्या माध्यमातून सेवा करणारे परशुराम बुवा उपाध्ये (नाते -महाड) व देवस्थानचे माजी अध्यक्ष गोपाळ दवटे यांचा गौरव समारंभ पार पडला.