चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा, हुतात्म्यांना शासकीय मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 05:06 PM2022-09-25T17:06:11+5:302022-09-25T17:07:19+5:30

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

92nd Martyr's Day of Chirner Jungle Satyagraha was celebrated with enthusiasm | चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा, हुतात्म्यांना शासकीय मानवंदना

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा, हुतात्म्यांना शासकीय मानवंदना

Next

मधुकर ठाकूर

उरण : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९२ वा स्मृती दिनाचा कार्यक्रम रविवारी (२५) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय इतमानाने पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरु होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता.त्याच वेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले होते. 

शांततामय रितीने सुरु असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये २० ते २२ वयोगटातील युवकांचाच अधिक सहभाग होता. जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछुट केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे),रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे) आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलु बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर अनेकजण जखमी झाले.

स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिध्द आहे. या लढ्यात उरण तालुक्यातील धारातिर्थी पडलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मुळगावी उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहावी यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. शासकीय इतमानाने साजराही करण्यात येतो. बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन, मानवंदना दिली जाते. पुष्पचक्र वाहात हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.

तसेच हुतात्म्यांच्या वारस, कुटुंबातील सदस्यांचा यथोचित सत्कार, सन्मान करण्यात येतो. ऐतिहासिक महत्व असलेल्या आणि स्वातंत्र संग्रामातील सुवर्ण पान म्हणून ओळखला जाणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा ९२ वा स्मृतीदिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (२५) उत्साहात पार पडला. ठिक बारा वाजता पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना पोलिसांनी शासकीय मानवंदना दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते, शेकाप आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण वपोनि सचिन पाटील,चिरनेर सरपंच संतोष चिर्लैकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हुतात्म्यांच्या त्यागातूनच स्वातंत्र्य मिळाले - माजी खासदार अनंत गीते 
केंद्रीय मंत्री असताना या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलो होतो. त्यानंतर आज पुन्हा आलो आहे. स्वातंत्र्य काळात शेतकरी, कष्टकरी यांच्याकडे जमिनी नसल्याने जंगल हेच त्यांचे उपजिविकेचे एकमेव साधन होते. या उपजिविकेच्या साधनांवर अर्थात एकप्रकारे जगण्यावर जुलमी ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. शेतकरी, कष्टकरी आणि सत्याग्रहींनी विरोध करत बंदी मोडून काढली. या हुतात्म्यांच्या बलिदानातुनच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत.

 

Web Title: 92nd Martyr's Day of Chirner Jungle Satyagraha was celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.