पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या ९३० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून हा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजुरीसाठी रखडला होता.
सभापती प्रवीण पाटील यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. पालिका आयुक्तांनी ९०६ कोटींचा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने अंदाजित ९३० कोटींचे बजेट मांडले होते. या अर्थसंकल्पात ६८ कोटी आस्थापनांचा खर्च, घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी ४० कोटी, रस्ते काँक्रिटीकरण ३५ कोटी, गावठाणासाठी २५ कोटी,आदी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ही सभा फडके नाट्यगृहात पार पडली. ९३० कोटींचे बजेट स्थायी समितीने मांडले होते. त्यामध्ये स्थायी समिती सदस्यांनी सुचविलेला बदल काही लेखा शीर्षकाला अंदाजित बाबीमध्ये वाढ करून या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
विरोधीपक्ष सदस्य अरविंद म्हात्रे यांनी या अर्थसंकल्पावर टीका करीत सत्ताधाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य या महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केले आहे. कोविडसाठीदेखील भरीव कोणतीच योजना या अर्थसंकल्पात नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.
विविध तरतुदींचा समावेशया अर्थसंकल्पात ६८ कोटी आस्थापनांचा खर्च, घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी ४० कोटी, रस्ते काँक्रिटीकरण ३५ कोटी, गावठाणासाठी २५ कोटी, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी १५ कोटी, विद्युत व्यवस्थेसाठी १५ कोटी, कचरा वाहतूक व मनुष्यबळ पुरवठा ३० कोटी आदी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.