जिल्ह्यात तीन वर्षांत ९६७ बालमृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:30 AM2018-12-08T00:30:14+5:302018-12-08T00:30:24+5:30
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध पुरवठा, सोनोग्राफी मशिन्स बंद अशा विविध कारणांमुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध पुरवठा, सोनोग्राफी मशिन्स बंद अशा विविध कारणांमुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत २१ ऑगस्ट रोजी ‘बालमृत्यू रोखण्याचे आव्हान’ ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच राज्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती.
या बातमीच्या आधारे विधिमंडळात दाखल तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हे खरे असल्याचे असे मान्य केले असून सदरप्रकरणी अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण, पुणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांना १२ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये सखोल चौकशी करण्याबाबत कळविल्याचेही स्पष्ट केले आहे.
मुंबईतील समर्थन संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश किर यांनी २४ आॅगस्ट २०१८ रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना लेखी तक्रार निवेदने दिली होती. या गंभीर प्रश्नी अपेक्षित कारवाई होत नसल्याने किर यांनी लक्षात आणून दिल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी याबाबत तारांकित प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात दाखल केला होता. त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उत्तर दिले.
कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी या बालमाता मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांना गेल्या १२ नोव्हेंबर रोजी चौकशीचे आदेश दिले. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून माता-बाल मृत्यूचे समोर आलेले आकडे अधिक गंभीर आहेत.
तीन वर्षात ९३७ बालकांचा मृत्यू झाला तर ८१ मातांना प्रसूती दरम्यान वा प्रसूती पश्चात प्राण गमवावे लागले आहेत. तरी आपण आपल्या स्तरावरुन सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल सादर करावा
असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
>चौकशी सुरू
बालमृत्यू व गरोदर मातांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु असून, ती पूर्ण होताच अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली. हे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.