रायगडमध्ये ९९.५७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:32 AM2018-05-22T02:32:44+5:302018-05-22T02:32:44+5:30

४६७ मतदारांनी बजावला हक्क : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक

99.57 percent voting in Raigad | रायगडमध्ये ९९.५७ टक्के मतदान

रायगडमध्ये ९९.५७ टक्के मतदान

Next

अलिबाग : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. रायगड जिल्ह्यात ९९.५७ टक्के विक्रमी मतदान झाले. ४६७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये २३७ स्त्री आणि २३० पुरुष मतदारांचा समावेश आहे. आठपैकी सहा मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले, तर पनवेल आणि कर्जत येथे प्रत्येकी एका मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांचे राजकीय भवितव्य सोमवारी मतपेटीमध्ये बंद झाले. २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच कोण विजयी होणार हे स्पष्ट होणार आहे.
सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतदान सायंकाळी चार वाजता संपले. कर्जत आणि पनवेल तालुक्यातील प्रत्येकी एका मतदाराने मतदान केले नाही. तर अलिबाग, महाड, माणगाव, पेण, रोहा आणि श्रीवर्धनमधील १०० टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
रायगड जिल्ह्यात ४६९, रत्नागिरी २५९ आणि सिंधुदुर्ग २१२ असे एकूण ९४० मतदार आहेत. शिवसेना आणि भाजपाच्या मतांची बेरीज केल्यास ४७१ होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस यांच्या मतांची आकडेवारी ही ४४३ होते. उर्वरित मतेही मनसे आणि अपक्ष यांची आहेत. मतांच्या आकडेवारीवरून युतीचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विजयाची खात्री साबळे यांना अधिक आहे, परंतु भाजपाने आपल्या पारड्यातील मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे तटकरे यांच्या गोटात आतापासूनच आनंदाचे वातावरण आहे. कोकणात शिवसेनेने चांगलेच बस्तान बसवलेले आहे. केंद्रात आणि राज्यात दोघांची सत्ता असली तरी, दोघेही एकमेकांना पाण्यात बघतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे साबळे यांच्या रूपाने आणखी एक आमदार कोकणात निवडून येणे भाजपाला नको असल्याचे बोलले जाते. त्याच कारणासाठी आघाडीचे उमेदवार तटकरे यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपाच्या काही मतदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केल्याची चर्चा आहे. सोमवारी झालेल्या मतदानाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी प्रशात ठाकूर यांनी, भाजपाच्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्रोटक उत्तर दिले.

कर्जतमध्ये १०३ मतदारांनी हक्क बजावला
1कर्जत : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीसाठी कर्जतमध्ये १०४ मतदारांपैकी १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेतकरी कामगार पक्षाचा एक मतदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानाला येऊ शकला नाही.
2स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कर्जत येथील प्रांत अधिकारी कार्यालयात मतदान केंद्र होते. कर्जत, खोपोली, माथेरान या नगरपालिका तसेच खालापूर नगरपंचायतीमधील सदस्य हे या निवडणुकीसाठी मतदार होते. तसेच दोन्ही तालुक्यातील १० जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही तालुका पंचायत समितीचे सभापती-उपसभापती यांचे ४ मतदार या निवडणुकीत मतदान करणार होते. दोन्ही तालुक्यातील १०४ मतदारांना मतदानाचा अधिकार होता.
3निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक कार्यकर्ते अनिकेत सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे तर शिवसेनेकडून राजीव अशोक साबळे हे निवडणूक रिंगणात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कळंब जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सुदाम पेमारे यांची प्रकृती बरोबर नसल्याने ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत.

भाजपा-राष्ट्रवादी पाठिंब्याची चर्चा
पनवेल : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक प्राधिकरणातील नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य आदींना या निवडणुकीत मतदानाचा हक्क असतो. भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला मतदान केल्याची चर्चा रंगली होती. पनवेलमध्ये भाजपाचे मतदान पाहता, तटकरे सकाळी १0 वाजल्यापासून पनवेलमध्ये तळ ठोकून होते. उरण, पनवेलचे ११८ मतदान येथील प्रांत अधिकारी कार्यालयात शांततेत पार
पडले.

Web Title: 99.57 percent voting in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.