थेट सरपंचपदासाठी 'मनी ॲन्ड मसल' पॉवरचा आधार
By निखिल म्हात्रे | Published: November 2, 2023 12:59 PM2023-11-02T12:59:49+5:302023-11-02T13:00:13+5:30
पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग - ग्रामपंचायत निवडणुकीची प्रचार आता संपला असुन सदस्य पदासाठी इलेक्टिव्ह मेरिट असले तरी सरपंच पदासाठी मात्र मनी ॲन्ड मसल' हाच निकष लावला जात असल्याने विकासाची दृष्टी असणारी माणसं या प्रक्रियेत येणार का?, हा खरा प्रश्न आहे.
पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो. या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करुन खरे तर गावचे रुपडे पालटण्याची दृष्टी असणारी माणसं निवडून जाणं अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या निवडणुकांचे स्वरुप व पैशांचा वापर पाहता अनेक ठिकाणी प्रतिष्ठेसाठी निवडणुका लढवल्या जातात.
चांगला उमेदवार निवडणे महत्त्वाचे -
राजकारणात इलेक्टिव्ह मेरिटला महत्त्व असले तरी ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर प्रभागातील समस्यांसाठी किती वेळ देईल, हेही मतदारांनी पाहणे अपेक्षित आहे. त्यात थेट सरपंच निवडीने सदस्यांचे महत्त्व कमी झाले आहे. सरपंचावर सदस्यांचा दबावच राहत नाही, त्यामुळे सरपंच सांगेल त्याप्रमाणेच निधीचे वाटप होते, परिणामी विकासाचा समतोल राहत नसल्याचे गेल्या पाच-सात वर्षात निदर्शनास आले आहे. यासाठी सरपंच पदावर तशी दृष्टी असणारी व्यक्ती निवडून जाणे गरजेचे आहे. मात्र अलीकडे ही दृष्टी मागे पडत चालली असून मनी, मसल पॉवर हाच निकष सगळीकडे लावला जात आहे.
आपल्यातील परके कोण ?
समजणारी निवडणूक आपल्यातील परके कोण व परक्यातील आपलं कोण?, हे समजायचे झाले तर ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागते. बहुतांश ठिकाणी जवळचेच लोक टांग मारत असल्याने या लोकांकडे अधिक लक्ष ठेवावे लागते.
आणाभाका सुरु....
सहकारी संस्थांची अथवा ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, आणाभाका आल्याच. त्यातही ग्रामपंचायतीची निवडणूक दहा-वीस मतांवर असल्याने आणाभाका जोरात असतात. गावातील सामाजिक प्रश्नाची चांगली जाण असणारे अनेक तरुण ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते रिंगणाबाहेरच राहीले आहेत.