रेवदंडा - ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी राज्यात आणि देशात निरूपणाच्या माध्यमातून अनेकांना व्यसनमुक्त करण्याचे महान कार्य करीत आहेत. मात्र, त्यांच्या रेवदंडा गावातच आता बीअर शाॅपीला परवानगी मागण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत याबाबत दोन प्रस्ताव मांडण्यात आले. मात्र काही ग्रामस्थांनी हरकत घेतल्याने त्यावर निर्णय झाला नाही.
गुरुवारी रेवदंडा ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा सरपंच मनीषा चुनेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांचा खारघरमध्ये उष्माघाताने मृत्यू झाला होता. सभेच्या सुरुवातीस संबंधित श्री सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर इतर विषय झाल्यानंतर बीअर शॉपी सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव वाचून दाखवण्यात आले.
संबंधित दोन अर्ज ग्रामस्थांना वाचून दाखविण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी कोणाची हरकत नसल्यास ना हरकत दाखला द्यावा, असे ठरले. त्यानंतर ग्रामस्थ आसद गोंडेकर यांनी आक्षेप घेतला. आपले गाव ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आहे. त्यांच्या कार्याने देशातील अनेक जण व्यसनमुक्त झाले आहेत. असे असताना गावात बीअर शॉपीला परवानगी देणे उचित ठरणार नाही, असे सांगत त्यांनी हरकत नोंदवली. त्यानंतर कोणालाच परवानगी देऊ नका, अशी चर्चा झाली. याचा निर्णय ग्रामपंचायत सदस्य घेतील, असे ठरवून सभा समाप्त झाली.
ग्रामसभेत बीअर शाॅपीला परवानगी मागणारे दाने अर्ज वाचून दाखवण्यात आले. यावर काही ग्रामस्थांनी हरकत नोंदवल्यानंतर उपस्थितांनी याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी अंतिम निर्णय घ्यावा, असे ठरले आहे. त्यानुसार जो निर्णय होईल, तो अर्जदारांना कळवण्यात येईल. - प्रदीप दिवकर, ग्रामविकास अधिकारी, रेवदंडा.