पनवेल : मुंबईगोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम ज्या ज्या कारणांनी रखडलेले आहे. त्यावर पुस्तक लिहिले जाऊ शकते. परंतु काहीही असले तरी मी ह्या खात्याचा मंत्री म्हणून माफी मागतो असे म्हणत खंत व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे गुरुवारी केले.
कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 कि.मी. आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 कि.मी. आणि मूल्य 35.99 कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी किंमतीच्या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर,जे.एम.म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता एस शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदि उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी त्यांनी 13,000 कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 12 तासांपर्यंत कमी करेल.
गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.“भारतात वर्षाला 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यापैकी 1.5 लाख प्राणघातक असतात, त्यापैकी बरेच जण 18-34 वयोगटातील मृत पावतात. हे त्रासदायक आहे. याबाबत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. उपग्रहावर आधारित टोल वसुली रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.यामुळे टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नसल्याची माहिती गडकरी यांनी दिली. महामार्गावर टोल नकोच मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या मार्गिकेमुळे आजवर या मार्गावर अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा हजारोंच्या घरात आहे.या मृतांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वहायची असेल तर या मार्गावर टोल नाके नको अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर यांनी केली. पळस्पे इंदापूर मार्गाच्या रखडलेल्या रस्त्याबाबत तसेच येथील अपघातांवर ठाकुर हे आवाज उठवत असतात.