होळीनंतर पर्यटनाला भरती; सुट्ट्यांमुळे किनारे हाऊसफुल्ल

By निखिल म्हात्रे | Published: March 31, 2024 05:46 PM2024-03-31T17:46:56+5:302024-03-31T17:47:08+5:30

हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस

A boost to tourism after Holi Beaches are full due to holidays | होळीनंतर पर्यटनाला भरती; सुट्ट्यांमुळे किनारे हाऊसफुल्ल

होळीनंतर पर्यटनाला भरती; सुट्ट्यांमुळे किनारे हाऊसफुल्ल

अलिबाग : दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर पर्यटकांचे लोंढे पुन्हा एकदा रायगडात दाखल होत आहेत. त्यामुळे येथील समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. अलिबाग, नागाव, वरसोली, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटक आल्याने परिसरातील हॉटेल, लॉजेस, रिसॉर्ट व्यावसायिकांना आता सुगीचे दिवस असल्याचे दिसत आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून येथील निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तू, खाण्यास ताजी मच्छीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनास येत असतात. सलग पडलेल्या सुट्ट्यांमुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात पर्यटक समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटत आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने रायगडला पर्यटकांची पहिली पसंती असते. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पश्चिम महाराष्ट्र या भागातून पर्यटक पर्यटनास आले आहेत. जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. जिल्ह्यातील नागाव, काशीद, वरसोली या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी बोटिंग, घोडागाडी सवारी यांसारख्या सुविधा असल्यामुळे किनाऱ्यावर पर्यटक याचा लाभ घेत आहेत.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून निवांतपणा मिळावा यासाठी पर्यटक रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर वेळ घालवण्यासाठी येत असतात. पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्याने हॉटेल, रिसॉर्ट यांच्यासोबत घरगुती लॉजेस चालवणाऱ्या स्थानिकांनाही आर्थिक फायदा होत आहे. तसेच, पर्यटनास आलेले पर्यटक परत माघारी फिरताना समुद्र किनाऱ्यालगतच असलेल्या स्टॅलमधून विविध प्रकारची लोणची, चिंचेचे गोळे, वाल, विविध प्रकारचे पापड, पांढरा कांदा या वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांनाही आर्थिक लाभ होत आहे.

अलिबागेत पर्यटकांची जत्रा
अलिबागेत पर्यटकांची जत्रा भरल्याचे चित्र समुद्रावर दिसत होते. समुद्रस्नानाचा आनंद बच्चे कंपनीसह मोठेही घेत होते. उंट, घोडा, तसेच एटीव्ही बाईकचा आनंद लुटताना पर्यटकांची धूम मस्ती सुरू होती. पर्यटक पुन्हा अलिबागेत येऊ लागल्याने स्थानिक व्यावसायिक आनंदित आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व्यावसायिक याना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.
 
घोडागाडी, एटीव्ही बाईकवर स्वार होऊन समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलवर वडापाव, भजी, पॅटीस असे वेगवेगळे प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आर्थिक मंदीमुळे झालेल्या लहान-मोठ्या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: A boost to tourism after Holi Beaches are full due to holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग