बोरखार खाडीपुल ते गोवा महामार्गाला जोडणारा पूल लवकरच उभारणार, महेश बालदी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2023 05:32 PM2023-08-20T17:32:11+5:302023-08-20T17:32:43+5:30
विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी ( दि२०) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
- मधुकर ठाकूर
उरण : अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोरखार खाडी पुल ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या दोन पदरी रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुमारे ४ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार आहे .त्यामुळे या खाडीपुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.यामुळे बोरखार परिसराचा कायापालट होईल असा विश्वास आमदार महेश बालदी यांनी मनोगतातून व्यक्त केला.
उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विंधणे ते बोरखार रस्ता डांबरीकरण करणे -४ कोटी ५० लाख , विंधणे ते खालचा पाडा रस्ता कॉक्रीटीकरण करणे -४० लाख , बोरखार येथील रंगमंच सुशोभित करणे- २० लाख , बोरखार येथील सभामंडप बांधणे -१५ लाख , बोरखार येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे -२० लाख ,टाकीगाव येथील रस्ता कॉक्रीटीकरण करणे - २० लाख , टाकीगाव येथे स्मशानभूमी बांधणे -१० लाख ,धाकटी जुई येथे सभामंडप बांधणे- १० लाख ,धाकटी जुई येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख ,खा.पाडा विंधणे येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख रुपये, विंधणे ( बौध वस्ती )येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व स्ट्रीट लाईट बसवणे - ३० लाख आदी विविध विकासकामांसाठी ६ कोटी ६० लाख रुपयाचा निधी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे .
या मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी ( दि२०) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. उरण तालुक्यातील बोरखार हे जेएनपीए बंदराच्या हाकेच्या अंतरावर असलेले विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनारी वसलेले एक दुर्गम गाव आहे.अशा गाव परिसराचा संपर्क हा तालुक्यातील विकसित भागाशी जोडता यावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या बोरखार खाडी पुल ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या दोन पदरी रस्त्यासाठी सुमारे ४ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार असून तेही काम लवकरच मार्गी लागणार आहे.त्यामुळे बोरखार परिसराचा कायापालट होईल असा विश्वास आमदार महेश बालदी यांनी मनोगत व्यक्त करताना केला आहे. विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथमच ६ कोटी ६० लाख रुपये व बोरखार खाडी पुलावर पुल उभारण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतल्याने बोरखार परिसरातील समाजसेवक तेजस डाकी यांनी आमदार महेश बालदी यांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.