उरणच्या शेतकऱ्याच्या १४०० चौमी भुखंड फसवणुकीप्रकरणी वकील पितापुत्रासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 08:03 PM2023-04-24T20:03:03+5:302023-04-24T20:07:18+5:30
सुनावणीनंतर उरण न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
उरण : सिडकोच्या साडेबारा टक्के योजने अंतर्गत शेतकऱ्याला देण्यात आलेला १४०० चौ.मी. चा भुखंड फिफ्टी-फिप्टी तत्वावर विकास करण्यासाठी दिलेला असताना शेतकऱ्याला अंधारात ठेवून परस्पर विक्री करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील बोकडवीरा गावातील शेतकरी चंद्रकांत पाटील (६५) यांना सिडकोच्या साडेबारा टक्के योजने अंतर्गत २००८ साली १४०० चौ.मी. भुखंड देण्यात आला होता. १४०० चौ.मी. चा भुखंड शेतकऱ्यांनी फिफ्टी-फिप्टी तत्वावर विकास करण्यासाठी करारपत्र तयार करून ॲड. हर्षल पाटील आणि ॲड.मेघनाथ पाटील या पिता पुत्रांकडे देण्यात आला होता.मात्र शेतकऱ्यांला अंधारात ठेवून विकासकाने कोट्यावधी किंमतीचा भुखंड सी-वुड-नवीमुंबई येथील बिल्डर संजय म्हात्रे यांना विक्री करण्याचा प्रयत्न सुरु केला होता.या फसवणूकीची कुणकुण लागल्याने चंद्रकांत पाटील यांनी सिव्हिल मॅटर असल्याने उरण न्यायालयात दावा दाखल केला होता.
सुनावणीनंतर उरण न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.उरण न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पनवेल येथील सेशन कोर्टात दाद मागितली होती. शेतकऱ्यांतर्फे ॲड. असीत चावरे आणि ॲड. तन्वीर पटेल यांनी कोर्टात युक्तिवाद करुन शेतकऱ्याची न्याय बाजू मांडली.सुनावणीनंतर पनवेल सत्र न्यायालयानेही उरण न्यायालयाचा निर्णय कायम करत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आणि शेतकरी चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर उरण पोलिस ठाण्यात २४ एप्रिल २०२३ रोजी ॲड. हर्षल पाटील आणि ॲड.मेघनाथ पाटील या पिता-पुत्रांसह ग्रीन एंटरप्राईसचे मालक संजय म्हात्रे आदी तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.