लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाचे १४ वर्ष रडत खडत सुरू आहे. १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच एका ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा रायगड पोलिसांनी दाखल केला आहे. इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराच्या महामार्गाच्या चौपदीकरण काम निकृष्ट आणि दर्जाहीन केल्याने अपघातात अनेकांचे प्राण गेल्याचा चेतक इंटरप्राईजेस लिमिटेड आणि अपको इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मैनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व नमूद प्रकल्पावर काम करणारे यांच्यावर ठपका ठेवून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुजित कावळे याना अटक करण्यात आलेली आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे रायगड हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदाव्दारे चेतक इंटरप्राईजेस लिमिटेड आणि अॅपको इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या संयुक्त कंपन्यांना १ जून २०१७ रोजी मंजूर केले. त्यानुसार १८ डिसेंबर २०१७ पासून कंपनीने काम सुरू केले. या मार्गाचे काम हे दोन वर्षात पूर्ण करण्याचे करारात म्हटले होते. मात्र मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही. तरीही शासनाने मुदत वाढून दिली होती.
महामार्गाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी आवश्यक असणा-या जागेपैकी सर्वसाधारणपणे ९१.८०% इतकी बोजारहित जागा शासनातर्फे हस्तांतरीतही करण्यात आली होती. दोन वर्ष कालावधी संपल्यानंतरही मुदत वाढ मिळूनही ठेकेदार यांचेकडून मुदत वाढ कालावधीत मासिक १०% यावेगाने काम पूर्ण न होता फक्त ४.६% यावेगाने काम झाले. ठेकेदार यास महामार्ग प्राधिकरणाकडून ०३ वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. कामाची गुणवत्ता तपासणाऱ्या प्राधिकृत अभियंता, मे.ब्लूम एल.एल.सी., यु.एस.ए., शाखा महाड यांच्या मार्फतीने एन.सी. आर. देण्यात आला होता. मात्र तरीही कामाचा दर्जा सुधारला नाही.
काम पूर्ण झालेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणी कामाकरिता डायव्हर्जन घेऊन महामार्गाच्या एकाच लेनवरुन जाणारी व येणारी वाहने वाहन चालकांना धोकादायक स्थितीमध्ये चालविणे भाग पडत होते. ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही त्या ठिकाणी रस्त्याचा भाग उखडून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि जुना रस्ता यामधील काही भाग खोदून ठेवून ते काम पूर्ण न करता तो तसाच अपूर्ण ठेवून दिलेला आहे. ज्या ठिकाणी अशाप्रकारे काम अपुर्ण ठेवलेले आहे त्या ठिकाणी महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होवू नये याकरिता कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केलेल्या नव्हत्या. त्यामुळे अपघात होऊन सन २०२० पासून आजपावेतो १७० मोटार अपघात होण्यास व त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस आणि एकूण २०८ प्रवाशांना लहान, मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती होण्यास त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत झालेले आहेत.
मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मैनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व नमूद प्रकल्पावर काम करणारे नमूद कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचे. तक्रारीवरुन माणगाव पो. ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक १९८/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील अधिक तपास मा. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बेलदार हे करीत आहेत.