करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:56 PM2022-12-06T17:56:56+5:302022-12-06T17:57:30+5:30

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

A fishing boat anchored in Karanja harbor caught fire | करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

Next

मधुकर ठाकूर

उरण: रंगरंगोटी, डागडूजी करून करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या  गजानन नाखवा यांच्या मालकीच्या देवी पलसाई माता या मच्छीमार बोटीला मंगळवारी (६) सकाळी आग लागली आहे.तीन अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. जेवण बनविताना आगीची दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आगीत जिवित हानी झाली नसली तरी मच्छीमार बोटीसह सुमारे ६० लाखांची सामुग्री जळून नष्ट झाली आहे.

उरण तालुक्यातील बापदेव पाडा-करंजा येथील मच्छीमार गजानन नाखवा यांच्या मालकीची देवी पलसाई माता ही मच्छीमार बोट रंगरंगोटी, डागडूजी करून समुद्रात नांगरुन ठेवण्यात आली होती.सकाळी १० -१०.३० वाजताच्या सुमारास स्टोवर जेवण बनविण्यात येत असताना बोटीतून धूर येण्यास सुरुवात झाली होती.धुरानंतर बोटीच्या पुढील भागात आग लागल्याचे कामगारांना आढळून आले. कामगारांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.मात्र त्यातुन काहीच निष्पन्न झाले नाही.उलट आगीचे प्रमाण वाढल्याने त्यांनी मदतीसाठी हाक दिली.दरम्यान बोटींमध्ये आगीचा भडका उडाल्यानंतर बंदरात जमलेल्या मच्छीमारांनी लागलीच अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाचे बंब समुद्रात पोहचणे शक्य नसल्याने आग लागलेली मच्छीमार बोट अन्य बोटींच्या सहाय्याने खेचून करंजा बंदरात आणण्यात आली.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.तोपर्यंत मच्छीमार बोटीचा पुढील भाग आगीत जळून गेला होता.या आगीत मच्छीमार बोटीतील जाळी,सामान आगीत भस्मसात झाला आहे. बोटीच्या मागील बाजूस डिझेलची टाकी होती.सुदैवाने डिझेलच्या टाकीपर्यंत आग पोहचली नसल्याने मोठा अनर्थ टळला.तरीही आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे ५० ते ६० लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याची साधार भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: A fishing boat anchored in Karanja harbor caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.