राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : अलिबाग तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी संदेश वाळंज यांना रस्त्यावर पडलेली अडीच तोळ्यांची भेटलेली सोन्याची चेन प्रामाणिकपणे अलिबाग पोलीस ठाण्यात जमा केली आहे. वाळंज यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बाबत त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तहसील कार्यालयातील कर्मचारी संदेश वाळंज हे बुधवारी कार्यालयीन कामासाठी बाहेर पडले होते. अलिबाग वेधशाळा येथे वाळंज आले असता रस्त्यावर काहीतरी चमकणारी वस्तू त्याच्या दृष्टीस पडली. त्यांनी आपले वाहन थांबवून चमकणारी वस्तू उचलली. चमकणारी वस्तू ही सोन्याची चैन असल्याचे लक्षात आले. अडीच तोळ्यांची चैन साधारण अडीच लाखाची होती. कोणा अज्ञात व्यक्तीची पडलेली चैन भेटूनही मनात लालसा उत्पन्न न होता वाळंज यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले.
अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन वाळंज यांनी रस्त्यावर भेटलेली चैन जमा केली. अलिबाग पोलीस ठाण्याचे सपोनी दत्तात्रय जाधव यांच्याकडे जमा केली. संदेश वाळंज याच्या प्रामाणिकपणाबाबत पोलीस, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्याचे कौतुक केले. कोणाची चैन हरवली असल्यास ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन अलिबाग पोलिसांनी केले आहे.