अलिबाग : श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा सोमवारी २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सारा रायगड जिल्हा हा राममय झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरात, गावात हा आनंदोत्सव साजरा होत आहे. अलिबाग शहरातही राममय वातावरण निर्माण झाले आहे. सकल हिंदू समाज तर्फे भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी रामाचा जयघोष करीत रॅली शहर भर फिरवून रामनाथ येथील पुरातन राम मंदिरात रॅली चे विसर्जन झाले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई ही रॅलीत सहभागी झाली होती.
पाचशे वर्षाने राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आयोध्या येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात होत आहे. सारा देश हा रामाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. अलिबाग शहरातही सोहळ्याच्या निमित्ताने सारे जण राममय झाले आहेत. त्यामुळे शहरात रामाचे प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने तालुक्यातील सकल हिंदू समाज हा एकत्रित आला आहे. अलिबाग शहरातील अरुण कुमार वैद्य शाळेच्या ठिकाणाहून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
ही रॅली शाळेच्या येथून बालाजी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शेतकरी भवन, महावीर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे रामनाथ येथील पुरातन श्री राम मंदिरात दाखल झाली. श्री रामाच्या नावाचा जयघोष रस्त्यावर दुमदुमला होता. यावेळी राम भक्त पारंपरिक वेश भूषेत आणि वाहनाला झेंडा लावून बाईक रॅलीत सहभागी झाले होते. शहरासह तालुक्यातील मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर, गावात रांगोळीने रामाच्या भक्तीत सर्वजण तल्लीन झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.