- मधुकर ठाकूर उरण - अयोध्येत सोमवारी राममंदिरात झालेल्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघं उरण राममय झाला होता.रामनामाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्त आबालवृद्ध सहभागी झाले होते.
राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने दोन दिवसांपासूनच उरणमधील रस्ते, मंदिरांची स्वच्छता करण्यात रामभक्त गुंतले होते.रस्तोरस्ती सडा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.उरण परिसरातील विविध देवीदेवतांच्या मंदिरांवर विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती.उरण शहरातील राममंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी दहा वाजता उरण शहरातील राममंदिरापासुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.डीजे,लेझीम, बॅण्डच्या तालावर आणि रामनामाचा जयघोष करीत या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने स्त्री,पुरुष, विद्यार्थी, आबालवृद्ध सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी झालेले हजारो रामभक्त देहभान विसरून गाण्यांवर उत्साहाने बेभान होऊन नाचत होते.शोभयात्रेत अनेकांनी राम-लक्ष्मण, सीता,हनुमान आदींच्या वेशभूषा केल्या होत्या.दोन तासांहून अधिक तास काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आमदार महेश बालदींसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
सोमवारी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवून शेकडो व्यापारी शोभायात्रेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.दुकाने बंद ठेवण्यात आल्यामुळे उरणची बाजारपेठ सोमवारी दुपारपर्यंत सुनसान झाली होती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी गणपती चौकात भव्य एलएडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो नागरिकांनी अयोध्येतील श्री रामाच्या मुर्तीच्या आयोजित प्राणप्रतिष्ठा थेट प्रक्षेपण सोहळ्याचा एलएडी स्क्रीनवरुन आनंद लुटला.